फडणवीस, तुला बळी पाहिजे ना? मी येतोजरांगेंचा संयम सुटला! नाट्यमय घडामोडींनंतर मुंबईला रवाना

जालना- मराठा आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णायक सभेत आज मोठे नाट्य बघायला मिळाले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळाल्याचा सगळा दोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.’राज्यात फडणवीसांच्या आदेशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. फडणवीसांनी मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना माझा बळी हवा आहे का?’ फडणवीस तुला बळी पाहिजे ना?, चल घे, मी येतोय मुंबईला सागर बंगल्यावर असे म्हणत जरांगे उठले आणि गाडीत बसून थेट फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले.
मनोज जरांगेंच्या या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जरांगेंनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. पण कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य ती कारवाई करावीच लागेल. सागर हा सरकारी बंगला आहे. तेथे सरकारी काम घेऊन कोणीही येऊ शकते. मात्र जरांगे हे कोणत्या निराशेतून बोलत आहेत, त्यांना कोणती सहानुभूती घ्यायची आहे, याची मला कल्पना नाही. जरांगे जी स्क्रिप्ट बोलत आहेत. तीच याआधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार बोलत होते. मी मराठा आरक्षणासाठी काय केले हे मराठा समाजाला ठाऊक आहे.
मनोज जरांगेंनी आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची निर्णायक बैठक बोलावली होती. या बैठकीला मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलकांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत बोलताना जरांगेंनी सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. जरांगे-पाटील म्हणाले की, एखाद्या खासगी माणसाने याचिका दाखल केली की त्यामध्ये सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. त्यासाठी सरकारला वेगळी याचिका दाखल करावी लागते, असे असताना फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. तसेच एका रात्रीत सुनावणीची तारीख बदलण्यात आली. 24 तारखेला रास्ता रोको करता येऊ नये म्हणून 23 तारीख करण्यात आली, असा आरोप जरांगे यांनी केला.
जरांगे पुढे म्हणाले की, माझी माझ्या समाजावर निष्ठा आहे. माझा समाज माझ्यासाठी देव आहे. म्हणून मी माझ्या समाजासाठी आंदोलन करत आहे. आजची आपली ही शेवटची आणि निर्णायक बैठक आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही. आता ही शेवटची घडी आहे. मी सामान्य घरातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी स्वार्थी, लबाड असतो तर या आधीच उघडा पडलो असतो. मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतानादेखील उपोषण केले होते. तेव्हादेखील मराठा आरक्षणाची मागणी केली होती. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानादेखील उपोषण करत आहे. त्यामुळे मी कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही. सरकारने आपल्याला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिले. पण आपली मागणी होती की, ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आपण सगेसोयऱ्यांच्या कायद्याची मागणी केली. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी केली नाही. आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्षातील अनेकजण आपल्या आरक्षणाच्या विरोधात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 4 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 2 आमदार यात आहेत. त्यांच्यामध्ये काही समन्वयकांचादेखील समावेश आहे.
त्यानंतर फडणवीसांवर घणाघाती आरोप करीत ते म्हणाले की, हे सगळे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुरू आहे. सगेसोयऱ्यांचा कायदा झाल्यावर गुलाल उधळण्याचे आपले स्वप्न होते. मात्र 10 टक्के आरक्षण द्यायचे त्यांचे स्वप्न होते. माराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीसांचे हे षडयंत्र सुरू आहे. फडणवीसांनी सांगितले तर लगेच कायदा होईल. तत्काळ आपल्याला आरक्षण मिळेल. कारण फडणवीसांच्या परवानगीशिवाय पानही हलू शकत नाही. पण त्यांना आपल्याला आरक्षण द्यायचेच नाही. मुख्यमंत्री शिंदेंना कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून फडणवीस अडवत आहेत. देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. त्यांना माझा जीव घ्यायचा आहे. मी तुमच्या सागर बंगल्यावर येतो. माझा बळी घ्या. उपोषण करून मरण्यापेक्षा फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन मरतो. माझा जीव गेला तरी मी माझ्या समाजासोबत गद्दारी करणार नाही. मी माझ्या समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. तुम्ही माझ्या नादी लागला आहात. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही कितीही काही प्रयत्न केलेत तरी मी तुम्हाला पुरून उरेल.
जरांगे पुढे म्हणाले की, फडणवीसांनी अनेकांना मराठ्यांच्या विरोधात उभे केले. नारायण राणेंनीसुध्दा मला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी पत्रकार परिषदेतून अनेकवेळा माझी बदनामी केली. बारसकर महाराजांनादेखील फडणवीसांनीच धाडले आहे. फडणवीसांनी बारसकर आणि राणेंच्या माध्यमातून माणसे सोडू नयेत. आणखी 16-17 जण माझ्या विरोधात येतील. फडणवीसांनी मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी सलाईन घेणे बंद केले. फडणवीसांना माझा एन्काऊंटर करायचा आहे. मी तुमच्या सागर बंगल्यावर पायी येऊन उपोषण करतो. तिथे मला गोळ्या घाला. सागर बंगल्यावर जाताना माझा जीव गेला तर मला फडणवीसांच्या बंगल्यासमोर न्या. फडणवीसांच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. त्यांना माझे उपोषण सोडण्यासाठी अंतरवालीत यायचे होते, पण त्यांना अंतरवालीत येऊ दिले नाही, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची माफी मागायला लावली याचा फडणवीसांना राग आला आहे. म्हणूनच त्यांना माझा जीव घ्यायचा आहे. त्यांच्या पुढे कोण गेले तर त्यांना आवडत नाही. फडणवीसांमुळे अनेकांना पक्ष सोडण्याची वेळ आली. त्यांच्यामुळे खडसे आणि पटोलेंनी भाजपा सोडला. अजित पवार कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाही, छगन भुजबळ कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाही, पण हे दोघे फडणवीसांच्या धाकाने गेले. त्यांच्यामुळेच भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची साथ सोडली. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नव्हते, अशोक चव्हाण कधीच काँग्रेस सोडू शकत नव्हते, हे यांच्या धाकाने गेले. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात दरी निर्माण केली. धनंजय मुंडेंना फडणवीसांनी गप्प केले. ज्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपा उभा केला, त्या गोपीनाथ मुंडेच्या मुलीची आज काय अवस्था आहे बघा. एकनाथ खडसे ज्यांनी भाजपा उभी केली, त्यांची काय अवस्था केली बघा. फडणवीस जानकरांना धनगरांचा नेता म्हणून कधीच मोठा होऊ देणार नाहीत. फडणवीसांचे ऐकले नाही तर काय होऊ शकते ही याची उदाहरणे आहेत. फडणवीसांच्या आदेशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. मराठ्यांनी शांततेत आंदोलने केली. पण फडणवीसांनी या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला सांगितले. गेल्या 75 वर्षांत 5 वर्षांसाठी सर्व पक्ष एकत्र सत्तेत आले असे कधीच झाले नव्हते. आता सगळे पक्ष एकत्र सत्तेत आले आहेत. त्यामुळे आपले हाल होत आहेत. 5 महिने झाले तरी अजून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. फडणवीसांनी सांगितले म्हणून सरकारने मराठ्यांना प्रमाणपत्रे देणे थांबवले.
जरांगेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिले की, माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला, पण खोटे आरोप सहन करणार नाही. माझा बळी घ्या, पण खोटे आरोप करु नका. माझ्याविरोधात राज्यातील एकाही पोलीस ठाण्यात एकही तक्रार दाखल असेल तर तुम्ही सांगाल ते मी करीन. माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्या विरोधात तक्रारी शोधल्या जात आहेत. संपूर्ण राज्यात माझ्या विरोधात छेडछाड, विनयभंगबाबत एकही तक्रार असल्यास जे सांगाल ते करायला तयार आहे. एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात तुम्ही हात घालू शकत नाही. तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करत आहात. पंतप्रधान मोदी त्यांच्या सत्तेसाठी शेतकऱ्यांना संपवत आहेत आणि इथे फडणवीस मराठ्यांना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. पटेल, यादव, जाट असे सगळे क्षत्रिय समाज यांना संपवायचे आहेत. मुस्लीम, धनगर समाजाला यांना आरक्षण द्यायचे नाही. यांनी त्यांच्या सत्तेसाठी धनगर समाजाचा वापर केला. मोठ्या जाती संपवून तुम्हाला छोट्या जाती मोठ्या करायच्या आहेत. उत्तर प्रदेशमधील बौद्ध समाज संपवला, महाराष्ट्रात मुस्लीम समाज संपवला. त्यांनी मोठ्या मोठ्या नेत्यांना पर्याय देऊन त्यांच्या मार्गातून बाजूला केले. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले होते. त्यांची सत्ता होती तोपर्यंत आरक्षण टिकले, मात्र त्यांची सत्ता गेल्यानंतर आरक्षणही रद्द झाले. आता पुन्हा फडणवीसांची सत्ता आली तर मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिले. यांना फक्त त्यांच्या सत्तेसाठी आरक्षण द्यायचे आहे. त्यांना समाजासाठी काहीच करायचे नाही, त्यांना केवळ सत्तेसाठी हा आरक्षणाचा खेळ खेळायचा आहे.
बैठक संपल्यानंतर जरांगे उपमुख्यमंत्री फडणवीसांविरोधात आक्रमक होत व्यासपीठावरून खाली उतरले आणि मुंबईच्या दिशेने निघाले. मराठा आंदोलकांनी जरांगेंना अडविण्याचा आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र जरांगेंनी कोणाचेही ऐकले नाही. उपोषण स्थळावरून खाली येताच जरांगेंना भोवळ आली. त्यामुळे अंतरवालीतील मराठा आंदोलकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तुमची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तुम्ही जाऊ नका, अशी विनंती आंदोलकांनी जरांगेंना केली. मात्र जरांगे सागर बंगल्यावर जाण्याच्या निर्णयावर ठाम होते. यानंतर ते काही वेळातच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जरांगे पैठण, शेवगावमार्गे मुंबईला जाणार असल्याचे सांगितले जात होते. त्यांना वाटेतच अडवण्यासाठी मराठा आंदोलक त्यांच्या मार्गावर अनेक ठिकाणी बसले होते.
जरांगेंच्या आरोपानंतर फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते फक्त मी काही ऐकलेच नाही, एवढेच म्हणाले. मात्र, भाजपाच्या इतर नेत्यांनी जरांगेंवर कडाडून टीका केली. याला वेगळे वळण लागावे, यासाठी काही शक्ती काम करीत आहेत. त्याला बळी पडू नका, असे बच्चू कडू म्हणाले. जरांगेंनी बालहट्ट सोडावा, असे काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले आशिष देशमुख म्हणाले, मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिल्याने तुमची खेळी संपली. त्यामुळे तुम्ही हे बोलत आहात, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रसाद लाड यांनी दिली. तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, जरांगे यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. तर मनोज जरांगेे-पाटील यांचा समाचार घेत आमदार नितेश राणे म्हणाले की, आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी? त्यांनी हा लढा कशासाठी सुरू केला होता? मनोज जरांगे जी स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत, ती नेमकी कुणाची आहे? हा लढा मराठा समाजाचा असेल तर तो लढा मराठा समाजापर्यंत मर्यादित ठेवावा. त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप करण्याचे राजकारण केले आणि खालच्या पातळीवर येऊन टीका केली. तर सागर बंगल्याची भिंतही त्यांना ओलांडता
येणार नाही.
तुतारी वाजली
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा असून तेच आंदोलनाला रसद पुरवतात, त्यामुळे जरांगे शरद पवारांविरोधात कधीच बोलत नाहीत, असा आरोप काही दिवसांपूर्वी झाला होता. आज जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांच्यावर तोफ डागल्यावर तुतारी वाजली, अशी प्रतिकिया सोशल मीडियावर उमटली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top