फिडेल कॅस्ट्रोच्या भगिनी जु्आनिता यांचे निधन

वॉशिंग्टन –

क्युबाचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट क्रांतीचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांची बहीण जु्आनिता कॅस्ट्रो यांचे निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी जु्आनिता यांनी अखेरचा श्वास घेतला. जु्आनिता गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहत होत्या. जु्आनिता यांच्या फिडेल अँड राउल ः माय ब्रदर्स, द सिक्रेट हिस्ट्री या पुस्तकांच्या सहलेखिका मारिया एंटोनिएटा कॉलिन्स यांनी जु्आनिता यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिली. कॉलिन्स यांनी लिहिले आहे की, ‘जु्आनिता कॅस्ट्रो या एक अद्भुत स्त्री आणि अद्भुत योद्धा होत्या. त्यांनी क्युबावर जिवापाड प्रेम केले.’
जु्आनिताने आपल्या भावाविरोधात अमेरिकेला पाठिंबा दिला होता. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआईएच्या मदतीने फिडेल आणि राऊल कॅस्ट्रो यांच्याविरुद्ध लढा दिला. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, १९६१ मध्ये बे ऑफ पिग्सच्या हल्ल्यानंतर त्या सीआयएमध्ये सहभागी झाल्या. बे ऑफ पिग्सच्या हल्ल्यात सीआयएने क्युबातील लोकशाही समर्थकांसोबत फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारवर हल्ले केले होते, परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.जु्आनिता पूर्वी त्यांचा भाऊ फिडेल कॅस्ट्रोच्या समर्थक होत्या. परंतु जेव्हा फिडेलने क्युबाचा हुकूमशहा फुलजेन्सियो बतिस्ता यांची हकालपट्टी करून सत्ता काबीज केली, तेव्हा जु्आनिता फिडेलच्या विरोधात मैदानात उतरल्या. जु्आनिता ह्या लोकशाही समर्थक होत्या. १९६३ मध्ये जु्आनिताच्या आईचे निधन झाल्यावर त्या क्युबा सोडून अमेरिकेत गेल्या. तेव्हापासून त्या अमेरिकेतील मियामी येथे राहत होत्या. १९८४ मध्ये जु्आनिता यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले. फिडेल कॅस्ट्रो यांनी २००८ पर्यंत क्युबावर सत्ता गाजवली. त्यांच्यानंतर त्यांचे भाऊ राऊल कॅस्ट्रो सर्वोच्चपदावर बसले. २०१६ साली फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top