बागेश्‍वर बाबांच्या दरबाराला अजित पवार गटाचा विरोध

पुणे – पुणे शहरात 20 ते 22 नोव्हेंबर या काळात भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फाऊंडेशनने बागेश्‍वर बाबांचा दिव्य दरबार भरवला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. मात्र, अजित पवार गटाने बागेश्‍वर बाबांना भोंदू बाबा ठरवत या दरबाराला विरोध केला आहे.
पुण्यातील तीन दिवसांच्या कार्यक्रमात बागेश्‍वर धाम महाराज यांचा हनुमान कथा सत्संग होणार आहे. यावेळी बागेश्‍वर महाराजांचा दिव्य दरबारही भरणार आहे. एकीकडे या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपकडून केली जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादीकडून कार्यक्रमाला विरोध होत आहे.
या दरबाराबाबत अजित पवार गटाच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘जगद्गुरु संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही’, अशी पोस्ट केली आहे. त्यासोबत धीरेंद्र शास्त्री यांचा फ्लेक्सचा फोटो पोस्ट केला आहे. गो बॅक बागेश्‍वर बाबा असा हॅशटॅगही ट्रेंड केला आहे. अजित गट आणि भाजप सत्तेत एकत्र आहेत. तरीही अजित गटाने जगदीश मुळीक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बागेश्‍वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करूनही भाजप नेते राज्यातील विविध ठिकाणी त्यांच्या दरबाराचे आयोजन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्येदेखील बागेश्‍वर महाराज यांचा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top