बाजीरावांच्या विहिरीचे छायाचित्र पोस्टकार्डवर ही सन्मानजन्य बाब

उदयनराजे भोसले यांचे विधान

सातारा

सातारा येथील जलमंदिर परिसरातील बाजीरावांची विहीर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, पुरातन विहिरीचे छायाचित्र, राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधून पोस्टकार्डवर छापण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. या पोस्टकार्डवर बाजीराव विहिरीचे छायाचित्र असल्याने, ही सातारच्या ऐतिहासिक दृष्टिकोनामधून अतिशय सन्मानजन्य घटना आहे, असे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले. एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर पुणे यांनी, रोहन काळे, राजेश कानिम आणि अनेकांच्या सहकार्याने, शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करून परिश्रमपूर्वक दिलेल्या योगदानाचे निश्चितच कौतुक आहे, असेही ते म्हणाले.

सातारा शहर ऐतिहासिक शहर आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची तिसरी राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली. येथूनच छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकवला. त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेसचा भाग असणारी आणि बाजीराव विहीर म्हणून ओळखली जाणारी ही विहीर बांधण्यात आली होती. ही विहीर १०० फूट खोल असून तिचा आकार पिंडीसारखा आहे. या विहिरीला ९ कमानी आहेत. या विहिरीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे दगडामध्ये राजचिन्हांसह शिल्प कोरण्यात आले आहे. या विहिरीमध्ये आजही जिवंत पाण्याचे झरे आहेत. पूर्वी ज्यावेळी कास योजना किंवा खापरी योजना अस्तित्वात नव्हती त्यावेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या याच विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत होते. दरम्यान, भारतीय पोस्ट खात्यातर्फे भारतातील उल्लेखनीय पायऱ्या असलेल्या विहिरींचे निरीक्षण करून, त्यातील बारव, बावडी, पुष्करणी, पोखरण, पायविहीर, घोडेबाव, पोखरबाव अशा वेगवेगळ्या विहिरींमधून राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील ८ विहिरींच्या छायाचित्रांचा समावेश त्यांच्या पुस्तिकेत करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक, अमरावती, पुणे, सातारा या जिल्ह्यातील प्रत्येकी एका विहिरीचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top