बायडन यांच्या सुरक्षेत त्रुटी ताफ्यातील गाडीला धडक

वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी आढळल्या आहेत. बायडन यांच्या ताफ्यातील एका गाडीला दुसऱ्या गाडीने धडक दिली. गाडीमध्ये बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन होती. दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे. काल रात्री उशीरा हा अपघाता झाला. अपघातानंतर बायडन यांच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी धडक दिलेल्या गाडीच्या चालकावर कारवाई केली. चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार,बायडन त्यांच्या पत्नीसह आणि पुनर्निवडणूक प्रचार पथकासोबत डाउनटाउन येथील विल्मिंग्टन प्रचार मुख्यालयातून बाहेर पडल्यावर ही धडक झाली. बायडन यांनी रात्री ८:०७ वाजता विल्मिंग्टनमधील बायडन-हॅरिस २०२४ मुख्यालय सोडले. ते त्यांच्या निवडणूक प्रचार पथकासोबत होते. बायडन यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच डेलावेअर परवाना प्लेट्स असलेल्या एका वाहनाने प्रचार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोटारगाडीचे रक्षण करणाऱ्या गाडीला धडक दिली. या अपघाताचा एक व्हिडीओदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला. अपघातानंतर लगेचच सुरक्षा अधिकाऱ्यांनी चालकाला घेरले त्याची चौकशी केली. यापूर्वी देखील बायडन सप्टेंबरमध्ये जी-२० परिषदेसाठी भारतात आले असता त्यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्या होत्या. बायडन यांच्या ताफ्यातील एका गाडीमध्ये दुसराच एक प्रवासी आढळला होता. या घटनेनंतर यंत्रणांनी चालकाला ताब्यात घेतले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top