बेहरामपुरचा गड राखताना अधीर रंजन चौधरींची दमछाक

कोलकाता – पश्चिम बंगालच्या बेहरामपुरचा गड राखताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची यावेळी फार दमछाक होताना दिसते. चौधरी या मतदारसंघातून तब्बल पाच वेळा निवडून आले आहेत. मात्र त्यावेळी त्यांचा सामना भाजपाचे निर्मल कुमार साहा आणि क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्याशी आहे.
साहा हे व्यवसायाने फिजिशियन आहेत. हजारो रुग्णांवर मोफत उपचार केल्याने त्यांची लोकप्रियता अफाट वाढली आहे. क्रिकेटवेड्या तरुणांमध्ये युसूफ पठाण लोकप्रिय आहे. त्याचबरोबर बेहरामपूरमध्ये मुस्लीम मजुरांची संख्या मोठी आहे. त्यांची मते युसूफ पठाणकडे वळण्याची शक्यता आहे.
बेहरामपूर शहरात हिंदू व्यापाऱ्यांचे प्राबल्य आहे. येथील आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांवर साहा यांचा प्रभाव आहे. त्यामुळे अधीर रंजन चौधरी यांच्यासमोर साहा यांच्या रुपाने मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अधीर रंजन चौधरी यांची प्रतिमा रॉबीन हूडसारखी आहे. त्यांना वन मॅन आर्मी असेही म्हटले जाते. अडचणीत असलेल्या लोकांना आर्थिक मदत करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात मदत करणे, गरजवंतांना वैद्यकीय उपचार मोफत मिळवून देणे यापासून ते कौटुंबिक वाद सोडविणे अशा कामांत अधीर रंजन चौधरी नेहमी आघाडीवर असतात. त्यामुळे हिंदु आणि मुस्लिमांमध्ये ते लोकप्रिय आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून त्यांची लोकप्रियता कमी कमी होत चालली आहे. २००९ मध्ये त्यांच्या मतांची टक्केवारी ५७ टक्के होती. २०१४ मध्ये ती ५०.५ टक्क्यांवर घसरला. पुढे २०१९ मध्ये त्यात आणखी घसरण होत त्यांच्या मतांची टक्केवारी ४५.५ टक्के एवढी कमी झाली.त्यामुळे यावेळची लोकसभा निवडणूक त्यांना काहीशी जड जात असल्याचे दिसते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top