बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची ५ ते ७ जानेवारीला प्राथमिक फेरी

मुंबई – सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीचा बिगुल वाजला असून ५ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत या स्पर्धेची प्राथमिक फेरी तर अंतिम फेरी १२ जानेवारीला दादरमध्ये होणार आहे.
प्रसिध्द नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रूप दिल्यावर २०१६ पासून ही स्पर्धा सुरू झाली. दोन वर्षांच्या कोविड काळानंतर तिकीट बुकिंगने हाऊसफुल्ल झालेली ही पहिली एकांकिका स्पर्धा होती. गेल्या सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या बोलींमधून २४९ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप असून प्रथम चार सांघिक विजेत्यांसाठी अनुक्रमे २५०००, २००००,१५००० व ५००० अशी पारितोषिके आहेत. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्काराने गौरवण्यात येणार असून हे पारितोषिक प्रख्यात अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे. अन्य पारितोषिकांमध्ये लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, विनोदी लेखन, विनोदी अभिनय, वाचिक अभिनय, व्यवस्थापन या यांच्यासाठीही पारितोषिके आहेत.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी ५ ते ७ जानेवारी या कालावधीत तीन दिवस कुर्ला-नेहरुनगर येथील प्रबोधन प्रयोग घरामध्ये होईल. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज www.supriyaproduction.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top