भाजपचा रामनामाचा कंदिल प्रचार! मुंबईत दिवाळीत कंदिल वाटप

मुंबई- तळकोकणात कंदिल प्रचार नावाची निवडणूक प्रचाराची एक छुपी पध्दत आहे. संध्याकाळी पाच वाजता निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यावर पूर्वी रात्रीच्या काळोखात कंदिल घेऊन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गावागावात जाऊन रात्रीच्या काळोखात गावक-यांना एकत्र करून कंदिलाच्या उजेडात प्रचार केला जात असे. पण आता भाजपने लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवत दिवाळीत रामनामाच्या कंदिलाचे वाटप सुरु केले आहे. प्रभूरामाचे छायाचित्र आणि त्यावर हाथ मे तलवार है…वाणी मे धार है..फिर भी शांत रहते क्योंकि राम के संस्कार है…असा संदेश देणारे कंदिल सध्या चर्चेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप रामनामाचा आधार घेणार हे स्पष्ट चित्र आता दिसू लागले आहे. भाजपच्या नेत्यांनी पाच राज्यातल्या निवडणूक प्रचारात उघडउघड रामाचा आधार घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी जर तेलंगणात भाजपचे सरकार आले तर आम्ही सगळ्यांना रामाचे दर्शन घडवू आम्हाला कोणताही फायदा नको. आम्ही सर्वांना राम मंदिराचे दर्शन घडवू असे वक्तव्य केले होते. त्यापूर्वी मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लांचे मोफत दर्शन घडवण्यात येईल या आश्वासनांवर विरोधकांनी टिका केली आहे. भाजपने बहुदा टूर्स अँड ट्रँव्हल्स कंपनी उघडली असावी अशी बोचरी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही रामनामाच्या प्राचारावर आक्षेप घेतला होता. १९८७मध्ये शिवसेनेने हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार काढून घेतला होता. पण रामाचा उघड प्रचार करणा-या भाजप नेत्यांना साधी नोटीसही पाठवली जात नाही. आचारसंहितेत काही बदल झाले आहेत का अथवा भाजपला फ्रीट हिट आहे हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करण्याची मागणी केली होती
रामनामाच्या भाजपच्या प्रचारावर विरोधकांनी कितीही आक्षेप घेतले असले तरी दुसरीकडे भाजपच्या रामनामाच्या प्रचाराचे लोण आता मुंबईत घराघरात भाजपने पोहोचवण्यास सुरवात केली आहे. भाजपच्या एका मंत्र्याने कार्यकर्त्याना व हितचिंतकांना दिवाळीत घरी मिठाई पाठवताना सोबत रामाचे छायाचित्र आणि रामनामाची महती सांगणारा कंदिल घरपोच पाठवून दिला आहे. अनेकांनी दिवाळीत हा कंदिल घराच्या दारात- खिडक्यांवर लावला पण २२ जूनला रामलल्ला अयोध्येच्या भव्यदिव्य राममंदिरात विराजमान होणार आहेत. त्यादिवशी मुंबईत घराघरात रामाचे कंदिल लावण्याची भाजपची योजना आहे. जानेवारीत संपूर्ण देश राममय करण्याची भाजपची देशव्यापी योजना असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top