‘भाजपाचे मूल’ नारायण राणेंना खांद्यावर घेतले! राज ठाकरे यांच्याकडून राणेंची वारेमाप स्तुती

कणकवली- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रेक्षकांच्या टाळ्या घेत म्हटले होते की, मी दुसऱ्यांची मुले खांद्यावर खेळवणार नाही, पण आज त्यांनी भाजपाचे मूल खांद्यावर घेत नारायण राणे यांच्या प्रचार सभेत हजेरी लावली. राज ठाकरे यांनी या सभेत उद्धव ठाकरेंवर कोकणातील जमिनी बळकावल्याचा आरोप केला आणि नारायण राणेंची वारेमाप स्तुती केली. मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेतच गोंधळ असल्याने त्यांचे आजचे भाषण अजिबात रंगले नाही.
रात्री 9 वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत राज ठाकरेंनी भाषण सुरू केले. माझे जुने मित्र, माझे सहकारी नारायण राणे अशी सुरुवात करून ते म्हणाले की, नारायणरावांचा फोन आला म्हणून मी नाही म्हणू शकत नाही, मी संबंध सांभाळणारा माणूस आहे.खरे तर या प्रचाराची गरज नव्हती, ते निवडून आलेलेच आहेत. हा सुजाण मतदारसंघ आहे, कोण आपले भले करू शकते ते त्यांना समजते आहे.
2014 ते 2019 या काळात मोदींकडून ज्या काही गोष्टी झाल्या, त्या मला पटल्या नाहीत, मी जाहीर विरोध केला. नोटाबंदी, पुतळे अनेक गोष्टी पटल्या नाहीत. ज्या पटल्या त्यांचे जाहीर कौतुक करतो. 370 कलम रद्द केले, अयोध्येत राममंदिर उभारले, हे सर्वोच्च न्यायालय आणि मोदींमुळे झाले. त्यानंतर आता मोदींच्या बाजूने असलेले आणि मोदींच्या विरोधात असलेले असे दोन गट आहेत. मला पटले नाही म्हणून मी विरोध केला. मुख्यमंत्रिपदासाठी विरोध केला नाही. मोदींनी अडीच अडीच वर्षे मान्य केले असते तर विरोधात बोलले नसते. ते म्हणतात, उद्योग गुजरातला जात आहेत, पण गेल्या दहा वर्षांतील सात वर्षे उध्दव ठाकरे सत्तेत होते, मग उद्योग का गेले? प्रकल्प आला की खासदार विरोध करणार, आमदार पाठिंबा देणार.
जैतापूरचा अणुप्रकल्प आला तर स्फोट होईल, आता गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तारापूर (महाराष्ट्र) एवढ्या राज्यात अणुउर्जा प्रकल्प आहेत. भाभा अणु संशोधन तर मुंबईत आहे. त्याला विरोध नाही, नाणारमध्ये जमिनी कुणी घेतल्या? नाणारला विरोध केला. मग बारसू शोधले, बारसूला म्हणे 5 हजार एकर जमीन आहे. म्हणजे कुणीतरी जमीन घेऊन ठेवली. हे सर्व जमिनीचे व्यवहार आहेत. प्रकल्प थांबवायचा, जमिनीची किंमत वाढवायची आणि मग जमीन द्यायची. इथल्या खासदारांचे हे धंदे आहेत.
मलेशिया हा मुस्लीम देश आहे. तिथे जेंटिंग बेटावरील एका बारमध्ये पाटी होती की, इथे मुस्लिमांना परवानगी नाही. कारण मुस्लीम धर्मात जुगार आणि दारू घेत नाहीत, तिथे व्यवसायासाठी हे करतात तर तुम्ही कसली संस्कृती जपत बसला आहात? गोवा पुढे गेला. कोकण इतका सुंदर प्रदेश आहे, पण काही करत नाही. इथे हॉटेल आणा. नारायण राणेंना सहा महिने मिळाले होते. पूर्ण पाच वर्षे मिळाली असती तर इथे प्रचाराला यायची गरज नव्हती. त्याचा कामाचा झपाटा अफाट आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपद हाताळले तसे कुणाला जमले नाही. नारायण राणेंना निवडून द्या. नुसता बाकड्यावर बसणारा खासदार हवा की कोकणचा विकास करणारा खासदार हवा आहे? मोदींचे सरकार आले की ते मंत्री असतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top