भाजपाला विरोध हीच आमची कायम स्पष्ट भूमिका त्यांना मी बोलावले नाही! पवारांनी विकेट काढली

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलेले आरोप शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन फेटाळले. अजित पवारांना मी बोलावले नाही. ते घरी आले आणि भाजपात जाण्याचा आग्रही विचार सातत्याने बोलून दाखवला. पण माझी भूमिका स्वच्छ होती की, भाजपसोबत जायला नको. भाजपसोबत जाण्याचा विचार हा जनतेसमोर आम्ही ज्या आधारे मते मागितली त्या विचारांशी सुसंगत नव्हता. तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता हेही मी स्पष्ट सांगितले होते, असे सांगत पवारांनी अजित पवारांची विकेट काढली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटाचे एकमेकांवर सातत्याने आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवारांनी आम्हाला गाफील ठेवले. त्यांच्या भाजपासोबत जाण्याबाबतच्या धरसोड वृत्तीमुळे सत्तेत जाण्याचा निर्णय लांबला. त्यांनी राजीनामा दिला आणि नंतर मागे घेण्यासाठी आंदोलने घडवून आणली असे आरोप अजित पवारांनी काल त्यांच्या गटाच्या शिबिरात केले होते. त्यानंतर आज शरद पवार यांनीही खासदार, आमदार आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शन केले. राज्यातील 14 ते 15 जागांवर ते लोकसभेसाठी उमेदवार उभे करणार असल्याचे बोलले जात आहे. ‘सत्ता येते, सत्ता जाते, लोकांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. नव्या उमेदीने कामाला लागा,’ असा संदेश त्यांनी पदाधिकार्‍यांना दिला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘बर्‍याच गोष्टी मलाही पहिल्यांदाच समजल्या. माझ्याकडून मी कधीच कोणाला बोलावले नव्हते. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. पक्षाच्या कोणत्याही सदस्याला अध्यक्ष म्हणून माझ्याशी सुसंवाद ठेवायला अडसर नसतो. माझ्या घरी येऊन ते काही तास बसले आणि आपण भाजपसोबत गेलो पाहिजे हा आग्रही विचार मांडला. अनेकवेळा सांगितले, पण हे शक्य नाही असे मी सांगितले. आमची भूमिका स्वच्छ होती की, भाजपसोबत जायला नको. तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता हेही मी त्यांना सांगितले. अखेर माझा नकार बघून ते थांबले. भाजपासोबत जाण्याचा विचार हा, जनमानसात आम्ही लोकांना जी आश्‍वासने दिली, ज्या आधारे मते मागितली त्या दृष्टीने सुसंगत नव्हता. आम्ही मते मागितली ती भाजपासोबत जाण्यासाठी नव्हती. विपरित कोणी सुचवले असेल तर ते लोकांना जे सांगितले त्याच्याशी फसवणूक होईल, अशी भूमिका माझ्यासह आमच्या अनेक सहकार्‍यांची होती. आमची शिवसेनेच्या संबंधीची भूमिका वेगळी होती. आजही आमची भूमिका भाजपाविरोधी आहे. सामूहिक निर्णय झाला होता की, भाजपासोबत जायला नको. आम्ही जो कार्यक्रम शिवसेना, काँग्रेससोबत ठरवला त्यात आता जे सांगताहेत ते मंत्रिपद घेऊन समाविष्ट झाले होते. राजकीय निर्णय घ्यायचा अधिकार त्यांचा आहे. पण निवडणुकीचा फॉर्म भरताना राष्ट्रवादी पक्षाच्या नावाने घेतला. लोकांसमोर ज्या आधारे मते मागितली त्याच्याशी विसंगत भूमिका घेऊ नये, असे माझे स्पष्ट
मत होते.’
शरद पवारांनी राजीनामा दिला आणि नंतर आंदोलने घडवून तो मागे घेतला, असा आरोपही अजित पवारांनी केला होता. त्यावर उत्तर देताना पवार इतकेच म्हणाले की, माझी निर्णय घेण्याची कुवत आहे. कोणाला सांगून मी राजीनामा द्यावा अशी स्थिती नव्हती आणि कोणाला सांगून निर्णय घेण्याची गरजही नाही.
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुस्तक लिहिणार असल्याचे म्हटले आहे. त्याविषयी शरद पवारांनी टिप्पणी केली. ‘लोक पक्ष सोडून का जातात यावर त्यांनी पुस्तके लिहावीत. पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय. निवडणूक झाली, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभव होऊनही पक्षाने केंद्रीय मंत्रिपद दिले ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायची गरज आहे. निवडणूक हरल्यावरही त्यांना केंद्रात मंत्रिपद कसे मिळाले आणि त्यांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले होते, हेही पुस्तकात लिहावे.’ दरम्यान, पदाधिकार्‍यांना संबोधित करताना ते म्हणाले की, ज्यांना मोठे केले तेच सोडून गेले. सोडून गेलेल्या लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. जे घडले त्याबाबत काळजी करू नका. नवीन चेहर्‍यांना संधी मिळेल. नेतृत्वाची नवी फळी तयार होईल. ही तुम्हा लोकांसाठी मोठी संधी आहे. फक्त त्यासाठी कष्ट केले पाहिजे. नव्या उमेदीने कामाला लागा. आपल्यावर टीका टिप्पणी केली जात आहे, त्याचा फारसा विचार करू नका. त्यांच्या हे लक्षात आले आहे की, अनेक लोक प्रश्‍न विचारतील. त्यांच्यापासून लक्ष विचलित करायचे आहे म्हणून त्यांनी ही टीका केली आहे. राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई, काही भागात अतिवृष्टीने शेतपिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. पंचनामे काही ठिकाणी सुरू आहेत, पण त्यांचा वेग कमी. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. राज्य सरकारने तातडीने या लोकांना मदत करण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे. हा प्रस्ताव पदाधिकार्‍यांच्या बैठकीत मांडला. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही मांडू, पण तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला तर त्यांच्या नजरेत हे मुद्दे आणून देऊ, असेही पवारांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांची
आज पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. अजित पवारांचे आरोप आणि बारामतीच्या जागेवरील उमेदवारी या मुद्यांच्या पार्श्‍वभूमीवर या पत्रकार परिषदेत त्या प्रकाश टाकतील, अशी शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top