भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या २०५० मध्ये ३४.७ कोटींवर जाणार!

मुंबई – संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या ताज्या अहवालानुसार २०५० पर्यंत भारतात वरिष्ठ नागरिकांची संख्या ३४.७ कोटी इतकी असेल.यादृष्टीने नागरिकांना पुरेशा प्रमाणात हृदयरोग चिकित्सा सुविधा देण्यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांनादेखील आधुनिक चिकित्सेचा लाभ होईल. यादृष्टीने टेली मेडिसिन व टेली रेडिओलॉजीचा कसा वापर करता येईल,याबाबत विचार विनिमय करावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली.
‘कार्डियाक इमेजिंग व क्लिनिकल कार्डिओलॉजी’ या विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयात येथे पार पडले,त्यावेळी ते बोलत होते.उद्घाटन सत्राला अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला, कार्डियाक इमेजिंग वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सी.एन.मंजुनाथ,वर्ल्ड फेडरेशन ऑफ कार्डियाक इमेजिंग अँड क्लिनिकल कार्डिओलॉजीचे अध्यक्ष डॉ.जी.एन.महापात्रा,इंदूरच्या अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक डॉ.विनोद भंडारी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल बैस म्हणाले की,इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धती सामान्य रुग्णांकरिता खर्चिक असतात.अशा चाचण्यांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बहुतांश विदेशात तयार होतात व ती महागडी असतात.त्यामुळे आधुनिक वैद्यकीय उपकरणे देशात तयार झाली, तर इमेजिंग चाचण्यांचा खर्च कमी होईल. तसेच हृदयरोग व त्यासाठी लागणारा रोगनिदान खर्च आयुष्मान भारत सारख्या योजनेतून मिळाला तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा फायदा होईल.२०- ३० वर्षांचे तरुण जिममध्ये व्यायाम करताना किंवा कामाच्या ठिकाणी अचानक कोसळल्याचे बातम्यांमध्ये पाहतो,तेव्हा अतिशय दुःख होते. हृदयविकार नियंत्रणात आणण्यासाठी तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top