भारतीय अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची होईल

नीती आयोगाचा अंदाज

नवी दिल्ली :

भारत देशाची अर्थव्यवस्था २०४७ सालापर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची होणार, अशी शक्यता नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांनी व्यक्त केली. सुब्रमण्यम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील तीन महिन्यांत व्हिजन इंडिया २०४७ जाहीर करण्याची शक्यता आहे.

याविषयी अधिक माहिती देताना सुब्रमण्यम यांनी सांगितले की, व्हिजन डॉक्युमेंटमध्ये उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक संरचनात्मक बदल आणि सुधारणांची रूपरेषा दिली जाईल. त्यात व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, भांडवल यांचा समावेश असेल. संशोधन आणि विकास संस्थांवरील देशाच्या जागतिक भागीदारीबद्दल तपशील असणे अपेक्षित आहे. सध्या, भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि या वर्षी जीडीपी ३.७ ट्रिलियन डॉलर असेल असा अंदाज आहे. 2030 पर्यंत भारताचा जीडीपी जपान आणि जर्मनीला मागे टाकेल असा अंदाज आहे.

यापूर्वी, एस अँड पी ग्लोबल आणि मॉर्गन स्टॅन्ले यांनी भाकीत केले होते की, २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जपान आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकेल. गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की २०७५ पर्यंत चीन ५७ ट्रिलियन डॉलरसह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. तर भारत ५२.५ ट्रिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर असेल. यूएस अर्थव्यवस्था ५१.५ ट्रिलियन डॉलरसह तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. तर जपान ७.५ ट्रिलियन डॉलरसह पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top