भारतीय वायुदलाने ध्वज बदलला! डाव्या कोपऱ्यात क्रेस्टला स्थान

प्रयागराज- भारतीय वायुदलाने आज आपल्या ध्वज बदलला असून वायुदलाच्या दिनानिमित्त प्रयागराज येथे झालेल्या वार्षिक परेड सोहळ्यात वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरींनी या नवीन ध्वजाचे अनावरण केले. ध्वजाच्या वरील डाव्या कोपऱ्यात फ्लाय साइडला वायुदल क्रेस्ट देण्यात आले आहे.
प्रयागराज येथे वायुदलाकडून आज सकाळी ९१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वायुदलाने परेडचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी परेडची सलामी स्वीकारली. त्यांच्या हस्ते परेडमध्ये वायुदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यासाठी वायुदलाचा जुना ध्वज उतरवून सन्मानपूर्वक हवाई दल प्रमुखांना सुपूर्द करण्यात आला. आता हा ध्वज वायुसेनेच्या संग्रहालयात प्रदर्शित केला जाणार आहे.
१९४५ साली वायुदलाच्या दर्जेदार कामगिरीमुळे वायुदलाच्या नावात रॉयल शब्द जोडून सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर वायुदल हे ‘रॉयल इंडियन एअरफोर्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र १९४७ मध्ये भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९५० मध्ये वायुदलाने आपल्या नावातील ‘रॉयल’ हा शब्द काढून टाकला आणि वायुदलाचा झेंडा देखील बदलण्यात आला. ध्वजाच्या डाव्या कँटनमध्ये यूनियन जॅक आणि फ्लाय साइडवर आरआयएएफ राउंडेल (लाल, पांढरा आणि निळा) याचा समावेश होता. मात्र स्वातंत्र्यानंतर भारतीय वायुसेनेचा ध्वजाच्या खालच्या उजव्या कँटनमधील यूनियन जॅकची जागा भारतीय तिरंग्याने घेतली आणि आरएएफ राउंडेलएवजी तिरंग्याचे राउंडेल देण्यात आले. भारतीय हवाई दलाने एका निवेदनात माहिती दिली की, भारतीय हवाई दलाचे मूल्य योग्य पद्धतीने दर्शवण्यासाठी नवीन ध्वज बनवण्यात आला आहे. ध्वजाच्या वरील डाव्या कोपऱ्यात फ्लाय साइडला हवाई दल क्रेस्ट देण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top