भूतानमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचा दणदणीत विजय

थिंफू
भूतानमधील संसदीय निवडणुकीत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) मोठी बाजी मारली. या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याने पीडीपीला नवीन सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संसदीय निवडणुकीत पीडीपीने 47 जागांपैकी 30 जागा आणि भूतान टेंडरेल पार्टीने 17 जागा जिंकल्या आहेत. पीडीपीच्या विजयानंतर शेरिंग तोबगे दुसऱ्यादा पंतप्रधान होणार आहेत. शेरिंग तोबगे यांचा पक्ष हा भारताचा समर्थक म्हणून ओळखला जातो.
भूतानच्या 5 लाख मतदारांनी भूतान टेंड्रेल पार्टी आणि पीडीपीच्या 94 उमेदवारांची संसद सदस्य म्हणून निवड केली. अन्य तीन पक्षांची या निवडणुकीत धुव्वा उडाला. भूतानमध्ये 2008 साली राजेशाही संपल्यानंतर आणि संसदीय प्रणाली लागू झाल्यानंतर ही चौथी संसदीय निवडणूक झाली. 2008 मध्ये संसदीय प्रणालीची स्थापना झाली, तेव्हा भूतानच्या पहिल्या संसदेत तोबगे विरोधी पक्षाचे नेते होते. त्यानंतर 2013 ते 2018 या काळात त्यांनी भूतानचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. 2018 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला होता.
शेरिंग तोबगे यांच्या पक्षाच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, भूतानमध्ये निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल माझे मित्र शेरिंग तोबगे आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे हार्दिक अभिनंदन करतो. मैत्री आणि सहकाऱ्याच्या आमच्या अनोख्या नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा काम करण्यास उत्सुक आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top