मणिपुरातील ११ मतदान केंद्रांवर सोमवारी पुन्हा मतदान होणार

इंफाळ 
मणिपूर लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी ११ मतदान केंद्रांवर गोळीबार आणि हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. आता या मतदान केंद्रावर २२ एप्रिल रोजी पुन्हा मतदान होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत.
जमावाकडून हिंसाचार, दंगली आणि तोडफोड झाल्याच्या अनेक अहवालानंतर ११ मतदान केंद्रांवरील मतदान रद्द करण्यात आले. त्यापैकी खुरई विधानसभा मतदारसंघात २ मतदान केंद्रे, क्षेत्रगावमध्ये ४ आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील थोंगजू येथे १ आणि उरीपोकमध्ये ३ आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कोंथौजममध्ये १ मतदान केंद्र आहेत. मणिपूरमधील संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी रामानंद नोंगमीकापम यांनी सांगितले की, वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. सर्वांनी पुन्हा मतदानाची मागणी केली. हिंसाचार, तोडफोड आणि कथित गैरवर्तनाचा हवाला देत तीन उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.  
दरम्यान, निवडणुकीदरम्यान गोळीबार, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएमचे नुकसान आणि बूथवर ताबा मिळवण्याचे आरोप झाले होते. यानंतर काँग्रेसच्या बाजूने पुन्हा मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. या घटनांमुळे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाला पत्र लिहून काही मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आवाहन केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top