मद्य घोटाळाप्रकरणी ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना अटक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू होईल, अशी आम आदमी पक्षाने भीती व्यक्त केली होती. ती अखेर खरी ठरली. आज मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व त्यांनी मोदी, केंद्र सरकार व भाजपा विरोधात घोषणाबाजी करून जोरदार आंदोलन केले. दरम्यान केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. तसेच या अटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून तातडीच्या सुनावणीची मागणी केली आहे.
मद्य घोटाळा प्रकरणात 9 समन्स पाठवूनही केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नव्हते. उलट त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अटकेपासून संरक्षण मागितले होते, पण आज त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीचे उपसंचालक मनोज कुमार मीना हे सर्च वॉरंट घेऊन आपल्या पथकासह केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. या पथकात 10 ते 12 पोलीस अधिकारी होते. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केजरीवाल यांची चौकशी सुरू झाली. ही चौकशी सुरू असतानाच बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. निवासस्थानाजवळ अडथळे उभे करण्यात आले. त्यानंतर आरएएफ आणि सीआरपीएफ जवानही तिथे पोहोचले. तसेच केजरीवाल यांच्या घराबाहेर कलम 144 लागू
करण्यात आले.
केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक आल्यावर मंत्री सौरभ भारद्वाज, आतिशी आणि अलका लांबा हेदेखील पोहोचले. परंतु त्यांना निवासस्थानाच्या आत जाऊ दिले नाही. तसेच त्यांचा केजरीवाल यांच्याशी फोनवर संपर्कही होऊ दिला नाही. आपचे अनेक समर्थकही निवासस्थानी पोहोचले आणि ते रस्त्यात ठाण मांडून बसले. याच दरम्यान दोन तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेचे वृत्त समजताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाहेर हंगामा सुरू केला. केंद्र सरकार, मोदी व भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. बाहेर कार्यकर्त्यांची संख्या आणि प्रक्षोभ वाढल्याने पॅरामिलीटरी फोर्सला पाचारण करण्यात आले. कारण ईडीच्या अधिकाऱ्यांना केजरीवाल यांना तेथून घेऊन जायचे होते. परंतु आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडविला होता. सुरक्षा दलाच्या जवानांनी रस्ता अडविणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. मोठ्या मुश्किलीने केजरीवाल यांना तेथून घेऊन गेले.
उद्या त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर केले जाणार आहे. केजरीवाल यांच्या अटकेचे वृत्त समजताच आम आदमीच्या कार्यकर्त्यांसह दिल्लीची जनताही रस्त्यावर उतरली. दरम्यान या अटकेचा आम आदमी पक्षाच्या नेत्यांसह सर्वच विरोधी पक्षांनी निषेध केला आहे. वेगाने हालचाल करून केजरीवाल यांनी आपल्या अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील आणि वेळ पडली तर तुरुंगातूनही कामकाज चालवतील. मात्र मोदी सरकारच्या या दडपशाहीसमोर आम्ही अजिबात झुकणार नाही. तर आम आदमीच्या नेत्या आतिशी यांनी सांगितले की, मोदी घाबरलेले आहेत. म्हणून ते अशा प्रकारची दडपशाही करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आम्ही त्यांना घाबरणार नाही, आज संपूर्ण देश बघतोय कशाप्रकारे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर आज ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत, त्या उद्या देशभर उमटतील आणि मोदींना याचा जबाब द्यावा लागेल. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर ईडीकडून अटक झालेले केजरीवाल हे दुसरे मुख्यमंत्री आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top