मध्य-हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई

मुंबई लोकल रेल्वेच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही गाड्या विलंबाने धावणार असून काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकापासून डाऊन मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर उद्या सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्द भागात विशेष लोकलफेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top