मराठा आंदोलनात दगडफेक टोपेंच्या सांगण्यावरून? सीबीआय चौकशीची मागणी! शरद पवार अडचणीत

जालना- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे-पाटील यांच्या उपोषणावेळी पोलिसांवर झालेली दगडफेक ही राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी कट रचून घडवून आणली, असा गंभीर आरोप करीत देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे आसाराम डोंगरे यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. राजेश टोपेंनी कट रचला तर तो शरद पवार यांच्या सांगण्यावरून रचला असणार असाही याचा अर्थ होतो. यामुळे डोंगरे यांच्या तक्रारीने मराठा समाजात खळबळ माजली आहे.
जालना आंदोलनासंदर्भात देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 1 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधवाचे उपोषण सुरू होते. तेथे पोलीस बंदोबस्त होता. मात्र येथे गावाबाहेरून काही समाजकंटक आले होते. हे लोक शहागड व बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांनी पोलिसांच्या घरावर जाऊन दगडफेक केली. त्यामुळे आंदोलन चिघळले आणि नाईलाजास्तव पोलिसांना लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा करावा लागला. 27 ऑगस्ट रोजी आमदार राजेश टोपे व त्यांच्या कार्यकर्त्यांची अंबड येथील अंकुश सहकारी साखर कारखाना येथे एक गुप्त बैठक झाली होती. मराठा समाजाच्या उपोषणामध्ये काही गडबड झाली तर पोलिसांवर हल्ला करण्याचा कट या बैठकीत आखला गेला होता. त्यामुळे, आमदार राजेश टोपे व त्यांचे स्वीय सहाय्यक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलीस व सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू होते. अंबड तालुक्यात हे आंदोलन टोपेंच्या मतदारसंघात येत असल्याने टोपे सुरुवातीपासून या आंदोलनस्थळी जातीने लक्ष देत होते. दरम्यान एकीकडे राजेश टोपे यांच्यावर देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानने गंभीर आरोप केले असताना, दुसरीकडे लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेच झाला असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. बीड येथील दौऱ्यात जरांगे माध्यमांना म्हणाले की, अंतरवाली सराटी गावात सुरू असलेले आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे डावपेच खेळण्यात आले. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला आम्ही सोडणार नाही, असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलन चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये महिला आणि लहान मुले मोठ्या प्रमाणात जखमी झाली. एवढे होऊन देखील सरकारने अद्यापही लाठीचार्ज का केला, याचे उत्तर दिलेले नाही.
देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठान ही संघटना छत्रपती संभाजी नगरमधील आहे. संघटनेचे अध्यक्ष डोंगरे यांनी 21 सप्टेंबर रोजीच पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र, 15 दिवसांनंतर आज हे पत्र आणि डोंगरे माध्यमांसमोर आल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या 14 ऑक्टोबरला जरांगे-पाटलांची अंतरवाली सराटीत मोठी सभा होणार आहे. या सभेची घोषणा स्वत: जरांगे- पाटलांनी केली होती. गेवराई तालुका आणि बीड जिल्हा, तसेच घनसावंगी, अंबड जिल्ह्यातील गोदाकाठच्या 23 गावांतील लोकांनी या सभेचे नियोजन केले आहे. त्यासाठी 100 एकर शेतीतील सोयाबीन, ऊस काढून शेत मोकळे केले आहे. या सभेला 30 लाख लोक येणार असल्याचा अंदाज आहे. कालच गावात पोलीस अधीक्षकांनी सभा स्थळाची पाहणी केली. 100 एकर जागा कमी पडेल. त्यामुळे तुम्ही 150 एकर जागा तयार ठेवा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या सभेआधी काहीतरी सनसनाटी आरोप करून सरकारच्या विरोधात असलेले वातावरण फिरवायचे यासाठी राजेश टोपेंवर आरोप केले असल्याची चर्चा अंबड गावात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top