मला कुणीतरी पाठीमागून ढकलले ममता बॅनर्जींच्या दाव्याने खळबळ

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी आपल्या राहत्या घरात तोल जाऊन शोकेसवर आदळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या. पण ममता खरेच तोल जाऊन पडल्या की त्यांना कोणीतरी पाठीमागून धक्का दिला,अशी चर्चा सुरू आहे.
पोलीस सुत्रांनी सांगितले की, आपल्याला कोणीतरी पाठीमागून धक्का दिला असे स्वतः ममता बॅनर्जी यांनी कोलकाताचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना सांगितले. मात्र याप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे. ममता यांना कोणी धक्का दिल्याचा उल्लेख त्यात नाही.त्यामुळे माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली.
ममता यांच्या भावजय कजरी बॅनर्जी यांनीदेखील मीडियाशी बोलताना ममता यांना कोणीतरी पाठीमागून ढकलले,असे सांगितले. त्यामुळे नेमके काय घडले आणि धक्का दिला असेल तर तो कोणी दिला असा प्रश्न निर्माण होतो. ममता यांना अपघात झाल्यानंतर त्यांचे काही फोटो तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये ममता यांच्या कपाळावर जखम दिसत असून जखमेतून रक्त वाहताना दिसते.हे फोटो पाहून देशभरातून चिंता व्यक्त झाली.
मात्र ममतांच्या डोक्यावर तीन टाके घातल्यानंतर काही वेळातच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. पोलिसांनी असेही सांगितले की, जरी या प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला नसला तरी या घटनेचा सखोल तपास केला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top