महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक

मुंबई – महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) एक्सक्यूज मी आणि स्टाईल चित्रपटाचा अभिनेता साहिल खान याला काल छत्तीसगडमधून अटक केली. साहिल खान याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर साहिलला छत्तीसगढच्या जगदलपूर येथून अटक करण्यात आली. आज पोलिसांच्या पथकाने त्याला विमानाने मुंबईत आणले. मुंबईत त्याला मुंबई उच्च न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
साहिल खानवर बेटिंग साइट चालवण्याचा आणि बेटिंग अ‍ॅपचा प्रचार केल्याचा आरोप आहे. मुंबईच्या माटुंगा पोलिसांच्या महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाच्या तपासात साहिल खानचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एसआयटीने काही दिवसांपूर्वी साहिलची चौकशी केली होती. साहिल लोटस बुक 24/7 नावाच्या बेटिंग अ‍ॅप वेबसाइटचा भागीदार आहे. ही वेबसाईट महादेव बेटिंग अ‍ॅप नेटवर्कचा भाग आहे, असे सांगितले जाते.
मुंबई सायबर सेलची एसआयटी काही आर्थिक आणि रिअल इस्टेट कंपन्या आणि वादग्रस्त महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांमधील कथित बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार हा घोटाळा अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा आहे. या प्रकरणी साहिल खान आणि अन्य 31 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात त्याची बँक खाती, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर उपकरणे तपासण्यात
आली आहेत. साहिल खानवर लायन बुक अ‍ॅपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्याने भागीदार म्हणून लोटस बुक 24/7 हे अ‍ॅप लाँच केले. अ‍ॅपच्या प्रचारासाठी साहिलने आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा आणि भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा.

दोन पिक्चर आणि फिटनेस फंडा
अभिनेता साहिल खान त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. ‘एक्सक्यूज मी’ आणि ‘स्टाईल’सारख्या दोन-तीन चित्रपटांत त्याने काम केले आहे. मात्र, त्याची अभिनय कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही. त्यामुळे त्याने ते क्षेत्रच सोडून दिले. यानंतर त्याचा फिटनेस प्रवास सुरू झाला आणि तो फिटनेस एन्फ्ल्यूएन्सर बनला. साहिल डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी चालवतो. ही कंपनी बॉडी बिल्डिंगसाठीची फूड सप्लिमेंट्स विकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top