महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये पर्यटकांसाठी १६ बोटी दाखल

कराड – सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील पालिकेच्या वेण्णा तलावात आता ड्रॅगन, फ्लेमिंगो, राजहंस, बदक आणि मोटार आदी विविध आकारात सुमारे १६ बोटी दाखल झाल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे.त्यानिमित्ताने उन्हाळी हंगामातील पर्यटकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज आहे.
पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणून वेण्णा लेक ओळखले जाते.पालिका प्रशासनाने बदक, राजहंस, फ्लेमिंगो, ड्रॅगन व मोटार आदी आकारात सुमारे ५५ बोटी मागवल्या असून त्यातील १६ बोटींचे काल लोकार्पण करण्यात आले. महाबळेश्वर येथे विविध पॉईंट व निसर्ग स्थळे पाहिल्यानंतर सूर्यास्त पाहत बोटिंगचा आनंद घेण्यासाठी वेण्णा लेक येथे पर्यटक येत असतात. उन्हाळी पर्यटनासाठी महाबळेश्वर येथे पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे.पुढील दीड दोन महिन्यात किमान दहा लाख पर्यटक महाबळेश्वरला येतील अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.पर्यटकांना नौका विहाराचा जास्तीत जास्त आनंद लुटता येईल या दृष्टीने बोटक्लब येथे या बोटी दाखल झाल्या आहेत. यावेळी या बोटी पाहण्यासाठी पर्यटकांनी, स्थानिकांनी गर्दी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top