महाराष्ट्र एनसीसीने पटकावला प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान

नवी दिल्ली

महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने ‘प्रधानमंत्री बॅनर’ हा प्रतिष्ठित पुरस्कार सलग तिसऱ्यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला (१२२ कॅडेटचा सहभाग), मेजर जनरल योगेंद्र सिंह आणि नेवल कॅडेट सृष्टी मोरे यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारला, तर एअर कॅडेट प्रितीलता झा यांनी पारितोषिक स्वीकारले.

नवी दिल्ली येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर एनसीसी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘प्रधानमंत्री बॅनर’ २०२३-२४ च्या विजेत्या आणि उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सलादेखील गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट काजल सातपुते,नचिकेत मेश्राम, खुशी झा, विवेक गांगुर्डे यांच्यासह संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग (वीएसएम) यांनी पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री बॅनर स्वीकारले. नागपूरच्या रिमाउंट व व्हेटेरिनरी स्क्वॉड्रन कॅडेटने सर्वोत्कृष्ट टेंट पेगर पारितोषिक जिंकले.

यावर्षी १ ते २७ जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. महिनाभर चाललेल्या शिबिरात छात्रसैनिकांनी कवायती, राजपथ संचलन, पंतप्रधानांना मानवंदना, पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन, फ्लॅग एरिया ब्रीफिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. यापूर्वी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला एकूण १९ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्राने मागील दोन वर्षांपासून प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. त्यामुळे महाराष्ट्राने तब्बल आठ वर्षानॉंतर सलग तीन वर्ष प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान पटकवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top