महालक्ष्मी रेसकोर्स मैदान वाचवण्याचे प्रयत्न निष्फळ ! व्यवस्थापनच नरमले

मुंबई- मुंबईचे एक आकर्षण असलेले दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी रेसकोर्सचे मैदान वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. दक्षिण मुंबईतील शेवटची मोकळी जागा अखेर पुनर्विकासाच्या नावाखाली ताब्यात घेण्यात मुंबई महापालिका यशस्वी ठरली आहे. यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात रेसकोर्सच्या व्यवस्थापनाने पालिकेला कौल दिला आहे.व्यवस्थापनाच्या ७०८ पैकी ५४० सदस्यांनी पालिकेसोबतच्या करार प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले,तर केवळ १८० जणांनी त्यास विरोध केला.

रेसकोर्सची जागा पालिकेची असून तिची भाडेपट्टा मुदत २०१३ मध्ये संपली आहे.त्यामुळे ही जागा ताब्यात घेऊन तिथे थीम पार्क उभारण्याचा पालिका आणि सरकारचा प्रस्ताव आहे.राज्य सरकार आणि महापालिका यांची रेसकोर्स मैदानातील २११ एकर जमिनीपैकी १२० जागेवर थीमपार्क उभारण्याची योजना आहे, तर ९१ टक्के एकर जागा ही रेसकोर्ससाठी वापरली जाणार आहे.थीमपार्कच्या जागेच्या बदल्यात रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ३१ मे २०५३ पर्यंत रेसकोर्ससाठी मुदतवाढ मिळणार आहे.मात्र थीमपार्क नेमके कशाप्रकारचे असणार आहे, याची नेमकी माहिती नाही. ही मुंबईतील एकमेव मोकळी जागा असल्याने या जागेवर थीम पार्क उभारण्यास ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविला आहे. व्यवस्थापनातील काही सदस्यांचाही त्याला विरोध आहे.

काही बड्या बिल्डरचा या जागेवर डोळा आहे. कारण या जागेच्या विकासातून त्यांना हजारो कोटी रुपयांचा नफा मिळू शकतो.ही जागा कायम मोकळी राहावी,अशी अनेकांची इच्छा आहे.मात्र भाडेपट्ट्याचे नूतनीकरण न करण्याची धमकी देऊन अधिकाऱ्यांनी व्यवस्थापकीय समितीच्या प्रमुखावर दबाव आणल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे पालिका आणि सरकारसोबत सामंजस्य करार केल्यामुळे क्लबला मोठा फायदा होणार आहे, असे पालिकेच्या बाजूने असलेल्या समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top