मालदीवच्या अध्यक्षांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या

माले –

मालदीव आणि भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. हा राजकीय वाद सुरू असतानाच मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी भारताला ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. याबाबत मोहम्मद मुइझ्झू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपीत द्रौपदी मुर्मू यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारा एक संदेश पाठवला आहे.

संदेशात राष्ट्रपती मुइझ्झू यांनी म्हटले आहे की, ‘७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी भारत सरकार आणि तेथील नागरिकांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की भारत आणि मालदीव यांच्यातील शतकानुशतके जुनी मैत्री आगामी काळात अधिक घट्ट होईल. मी भविष्यात भारत सरकार आणि लोकांसाठी शांतता आणि विकासासाठी शुभेच्छा देतो.’ मालदीव आणि भारतामधील वादानंतर भारतीयांसह अनेकांनी मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकत लक्षद्वीपचा पर्याय पसंत केला. मालदीवच्या उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाला. भारतीयांनी मालदीवमधील पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणावर बहिष्कार टाकला होता.

कुवेत येथील भारतीय दूतावासात काल प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील भारतीय समुदायाचे ४ हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. कुवेतमधील भारतीय राजदूत आदर्श स्वैका यांनी ध्वजारोहण केले. रशियन दूतावासानेही प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हिडिओद्वारे अभिनंदनाचा संदेश दिला आहे. यामध्ये दूतावासातील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि मुले व्यावसायिक नर्तकांसोबत गदर चित्रपटातील ‘मैं निकला, गड्डी ले के’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. इस्रायलच्या दूतावासानेही एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी कुर्ता-धोती परिधान करून भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top