मालीमध्ये बस पुलावरून कोसळून भीषण अपघात! ३१ जण ठार! १० जखमी

बामाको- आफ्रिकन देश माली येथील केनिबा परिसरात असलेली बागो नदी ओलांडणाऱ्या पुलावरून एक प्रवासी बस खाली कोसळली. या अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले. काल संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
प्रवासी बस बुर्किना फासोच्या दिशेने जात होती. यावेळी बस बागो नदीच्या पुलावर आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली. या अपघातातील मृतांमध्ये पाश्चिम आफ्रिकन उपप्रदेशातील मालियन आणि इतर ठिकाणाच्या नागरिकांचा समावेश आहे. याबाबत परिवहन मंत्रालयाने सांगितले की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे. हा अपघात अतिशय भीषण होता. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेे असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. माळी येथे वारंवार रस्ते अपघात होत असतात. देशातील अनेक रस्ते, महामार्ग आणि वाहनांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील मालीमध्ये बस आणि ट्रकची धडक होऊन अपघात झाला होता. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top