मिचाँगचा आंध्र-तामिळनाडूला फटका रेल्वे-विमानसेवा बंद! पर्यटक अडकले

चेन्नई –

मिचाँग चक्रीवादळाचा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाला फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. चक्रीवादळामुळे येथील अनेक उड्डाणे आणि २०४ रेल्ववेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक पर्यटक तिरुपतीमध्ये अडकले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या अधिक आहे.

तीव्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, आंध्र प्रदेश सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनासीमा आणि काकीनाडा या ८ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला. या चक्रिवादळात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः तामिळनाडू आणि पुद्दुचेरीला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एनडीआरएफची २२ पथके ३ राज्यांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. किनारपट्टीवरील सखल भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मुसळधार पावसामुळे चेन्नईसह नऊ जिल्ह्यांमध्ये एकूण ६१,६६६ मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. ज्यामध्ये सुमारे ११ लाख पाकिटे अन्न आणि १ लाख पॅकेट दुधाचे वाटप करण्यात आले. सकाळपासून चेन्नईच्या बहुतांश भागात हलका पाऊस होता. त्यामुळे अधिकाऱ्यांना बचाव आणि मदतकार्य करता आले. अडकलेल्या लोकांना बोटी आणि ट्रॅक्टरचा वापर करून बाहेर काढण्यात आले.

गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना मदत उपाययोजना करण्यासाठी हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले. तसेच एका खासगी वाहकाने दुबई आणि श्रीलंकेच्या विमानासह ४ आंतरराष्ट्रीय सेवा रद्द केल्या, तर ३ आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंगळुरूला वळवली. मिचाँग चक्रीवादळ येत्या २४ तासांत धडकण्याची शक्यता असल्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश हाय अलर्टवर आहेत. चेन्नईमध्येच चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top