मी जे केले ते 2004 सालीच करायला हवे होते त्यांनी केले की स्ट्रॅटेजी! मी केले की गद्दारी होते!अजित पवारांनी इतिहासच सांगितला

इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका करीत त्यांनी स्ट्रॅटेजीच्या नावाखाली सतत कशी उलटसुलट भूमिका घेतली. याची 1978 पासून आतापर्यंतची माहिती दिली. ते शेवटी म्हणाले की, आम्ही केले तर गद्दारी आणि त्यांनी केले तर स्ट्रॅटेजी असे आहे. मी आज जे केले ते 2004 सालीच करायला हवे होते.
अजित पवार भाषणात म्हणाले की, अजित पवारांनी हा निर्णय का घेतला? 1978 साली पवारांनी यशवंतरावांचे ऐकले नाही. ज्यांनी संधी दिली त्यांचे न ऐकता पुलोद सरकार स्थापन केले. 1986 साली आम्हाला सांगितले की, समाजवादी काँग्रेस पक्ष हा इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन करायचा. 1991 साली पी. व्ही. नरसिंहरावांनी सांगितले की, विश्‍वासदर्शक ठराव झाल्यावर राजीनामा द्यायचा. मी काही न विचारता खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर साहेब दिल्लीला गेले. या सर्व काळात त्यांचा पूर्ण प्रचार मी बघत होतो. दूध संघ, कारखाने सर्व साहेबांच्या बरोबर राहतील ते आम्ही केले.
1999 साली सोनिया गांधी परदेशी आहेत हा मुद्दा काढला. मग राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा आम्ही साथ दिली. त्यानंतर म्हणाले, परकीय मुद्दा सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये जायचे. आम्ही काही बोलायचो नाही. कारण ते दैवत होते. ते म्हणतील ती पूर्व दिशा मानायचो. मी साथ देतो. सर्व सहकारी साथ देत होतो.
1999 साली सरकार बनविले, 2004 साली सरकार बनले. तेव्हा विलासराव देशमुख मला म्हणाले की, मॅडम म्हणाल्या आहेत की, काँग्रेसला अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे तुमचा मुख्यमंत्री कोण बनणार आहे? तुम्ही, भुजबळ की आर.आर.पाटील? पण आम्हाला सांगितले की चार मंत्रिपदे, चार खाती आपण जास्त घेतली, आपल्याला मुख्यमंत्रिपद नको. कठीणच झाले. तेव्हाही ऐकले. कधी कधी वाटते की, आता जे केले ते तेव्हाच करायला हवे होते.
2014 साली आमचे पृथ्वीराज चव्हाणांबरोबर जमेना, म्हणून आम्ही, काँग्रेस, भाजपा, शिवसेना सर्व स्वतंत्र लढलो. मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केले की, भाजपाला आपला बाहेरून पाठिंबा आहे. मी याबाबत विचारले तेव्हा म्हणाले की, ही स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी आणि आमची मात्र गद्दारी. मी गप्प बसलो. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर आम्हाला शपथविधीला जायला सांगितले. आपण सहा महिन्यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार होतो, पण विस्तार झाला नाही. त्यानंतर भाजपाने पाठिंबा गृहीत धरू नये असे जाहीर केले. त्याच दिवशी संध्याकाळी शिवसेना सत्तेत गेली.
2017 साली तटकरे प्रांताध्यक्ष होते. पुन्हा भाजपाशी चर्चा झाली. मंत्रिपदे ठरली, पण दिल्लीत अमित शहा म्हणाले की, शिवसेनेला सोडणार नाही. तिघांचे सरकार करू. तेव्हा साहेब म्हणाले की, शिवसेना चालत नाही. सगळे बारगळले. 2019 साली उद्योगपतींकडे पाच-सहा बैठका झाल्या. फडणवीस मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री. त्यावेळी अमित शहांनी मला बाजूला घेऊन म्हणाले की, राष्ट्रवादीचा अनुभव चांगला नाही, जे ठरले ते घडायला हवे. तिथून परतलो तर हे म्हणाले, शिवसेना, काँग्रेसबरोबर सरकार करायचे. पुन्हा म्हणाले, स्ट्रॅटेजी आहे. एकदा साहेब आणि खरगेंचा खटका उडाला. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला हवे होते. तेव्हा मी पुन्हा वर्षावर भाजपाकडे निघालो. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, चर्चा करा, पण फट ठेवा. मी शपथ घेतली, त्यांनी सर्व फिरवले. काँग्रेसने उघड मतदानाचा निकाल घेतला. ते सरकार पडले. मग मी उपमुख्यमंत्री झालो.
ते शेवटी म्हणाले की, तुमच्या घरात 40 वर्षे सून राहिली तरी तिला बाहेरचीच म्हणतात. म्हणजे सून बाहेरची वाटते, मुलगी आपली वाटते. तेव्हा आपले कुटुंब डोळ्यासमोर आणा. सून, जावई डोळ्यासमोर आणा आणि मतदान करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top