‘मी पुन्हा येईन’ म्हणत त्यांनी हेही करून दाखवले! उद्धव विरुद्ध राज! आता एकमेकांविरुद्ध अधिकृत लढा

मुंबई- लोकसभेत 400 पार करण्यासाठी भाजपा चाणक्यच्या सर्व नीती बेलगाम वापरत आहे. ‘मी पुन्हा येईन’ म्हणालो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी आता भावाला भावाविरुद्ध अधिकृतपणे, अगदी जाहीरपणे लढण्यास सज्ज केले आहे. येत्या दोन दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत येतील आणि उद्धव ठाकरेंच्या मविआ विरोधात किमान दोन जागांवर उमेदवार जाहीर करतील. त्यासाठी राज ठाकरे यांनी 21 मार्चला मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे.
मनसेे अध्यक्ष राज ठाकरेंनी 2019 साली भाजपा विरोधात तोफ डागत निवडणूक लढवली. तेव्हा त्यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात रान उठवले होते. त्यावेळी त्यांना विधानसभेत 3.1 टक्का आणि लोकसभेत 1.5 टक्का मतदान झाले. त्यांचा एकच कल्याणचा शिलेदार जिंकला. इतर उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. या धक्क्यानंतर राज ठाकरे शांत राहिले. पण 2024 ची लोकसभा, त्यानंतर विधानसभा आणि मग स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ जवळ येताच ते भाजपा विरोध विसरले. भाजपा नेते आणि शिंदे गटाची त्यांच्या घरी उठबस वाढली. अलीकडे 9 मार्चला पक्षाच्या वर्धापन दिनीही त्यांनी आपले पत्ते लपवून ठेवले. राज ठाकरे पक्षाच्या हिताचा निर्णय घेतील, असे त्यांचे नेते
सांगत राहिले.
आज अखेर महायुती समवेत जाण्याचा त्यांचा निर्णय झाला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाल्यावर युतीत जाण्याचे ठरले. दोन जागांवर मंजुरी मिळाली. दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर आणि कदाचित नाशिकची जागा मनसेला द्यायचे निश्चित झाले. त्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब करिता राज ठाकरे हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सोबत न घेता पुत्र अमित ठाकरेला घेऊन दिल्लीत दाखल झाले. हॉटेल मानसिंगमध्ये त्यांचा थाट राखला होता. भाजपा सरचिटणीस विनोद तावडे त्यांना भेटायला आले. राज ठाकरेंच्या दिमतीला पांढरी मर्सिडीज, डझनभर सुटबुटातील अंगरक्षक आणि गाड्यांचा ताफा होता. दिल्ली विमानतळावर ते उतरले तेव्हा पत्रकारांनी त्यांना छेडता ते म्हणाले की, त्यांनी या म्हटले, मी आलो. आज दुपारी 12.30 वाजता ते कृष्ण मेनन मार्गावरील अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांना भेटले. अमित शहा आणि राज ठाकरे, अमित ठाकरे अशी 40 मिनिटे भेट झाली. या भेटीनंतर पत्रकारांशी न बोलता राज ठाकरेंनी मुंबई गाठली. सायंकाळी त्यांच्या मुंबईतील घरी बाळा नांदगावकर, अभ्यंकर हे नेते पोहोचले. आता उद्या किंवा परवा मनसेचा महायुतीत प्रवेश जाहीर होईल.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या महायुतीत जाण्याने काहीच परिणाम होणार नाही. भाजपा नेते मुनगंटीवार म्हणाले की, ते मोदी प्रशंसक आहेत, ते आले तर त्यांचे स्वागतच होईल. 2024 च्या सर्व निवडणुका लक्षणीय ठरणार आहेत. कारण दोन भाऊ एकमेकांविरुद्ध लढतील, काका-पुतण्या एकमेकांवर टीका करतील. पक्षप्रमुखांच्या विरोधात त्यांचे बिन्नीचे शिलेदार आग ओकतील आणि ‘मी पुन्हा येईन’ म्हणत भाजपा जिभल्या चाटेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top