मुंबईकरांचे पाणी महाग होणार पालिकेचा ८ टक्के करवाढीचा प्रस्ताव

मुंबई – मुंबईकरांचे पाणी महाग होण्याची शक्यता आहे.कारण पालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टी शुल्कात ८ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पाठविला आहे.हा प्रस्ताव आयुक्तांनी स्वीकारला असून त्यावर येत्या २५ नोव्हेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ मंजूर झाल्यास १ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

कोरोना साथीच्या आजारामुळे पालिका प्रशासनाने २०२० पासून पाणी करात वाढ केलेली नाही.आता जलअभियंता विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार,मुंबईला सात धरणांमधून दररोज ३९५० दशलक्ष लीटर पाणी लागते. हे पाणी १२० किमी अंतरावरून पाईपलाईनद्वारे आणले जाते.हे धरणांचे पाणी आणणे,मशिन्सची देखभाल,पाणी शुद्ध करणे आणि वीज शुल्क यासाठी राज्य सरकारला रॉयल्टीची रक्कम भरावी लागते.२०१२ मध्ये स्थायी समितीने ८ टक्क्यांपर्यंत पाणीपट्टी वाढ करण्याचे प्रशासनाला अधिकार दिले आहेत.त्यानुसार दरवर्षी १६ जूनपासून प्रशासन पाणीपट्टी दरवाढ लागू करते.परंतु कोरोना महामारीचा विचार करता २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये करांमध्ये बदल करण्यात आलेला नव्हता.त्यामुळे आता हा पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आहे.नवीन पाणीपट्टीला मंजुरी मिळाल्यावर नागरिकांना जागरुक करण्यासाठी नव्या पाणी कराचे दर नमूद करणारी जाहिरात वर्तमानपत्रात दिली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top