मुंबईची सातही धरणे आटली फक्त २०.२८ टक्के पाणीसाठा

मुंबई- कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे झपाट्याने आटत चालल्याने चिंता वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत सध्या फक्त २०.२८ टक्केच पाणी शिल्लक असून गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल सात टक्क्यांनी कमी आहे. त्यातच हवामान खात्यानेही पुढील काही दिवस असाच ‘उन्हाळा’ राहणार असल्याचा इशारा दिल्याने मुंबईवर १० ते १५ टक्के पाणीकपातीचे संकट निर्माण झाले आहे.

मुंबईला महापालिकेकडून अप्पर वैतरणा,मोडक सागर,
तानसा,मध्य वैतरणा, भातसा,विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभर पाणीसाठा सुरळीत सुरु राहण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी १,४४,७३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. यानुसार वर्षभराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षापासून मान्सून सक्रिय होण्यास विलंब होऊ लागल्याने तलाव तळ गाठत आहे.त्यामुळे १० ते २० टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाते.गेल्यावर्षी १७ ऑक्टोबरपर्यंत मान्सून बरसत होता. मात्र या वर्षी २९ सप्टेंबर रोजी पाऊस पडणे बंद झाले. यामुळे दरवर्षी वाढीव ५ ते ७ टक्के जादा मिळणारे पाणी या वर्षी मिळालेच नाही, पण १ ऑक्टोबरपासून पाण्याचा वापर मात्र सुरू राहिला. यामुळे यावर्षी पाण्याची तूट दिसत आहे. तरीही यंदा समाधानकारक पाऊस पडेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे मुंबईला पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही,अशी ग्वाही पालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top