मुंबई- आगामी तीन वर्षांत बेस्ट बसेसच्या संख्येत वाढ होणार आहे.त्यामुळे आता बेस्टच्या पाच डेपोमध्ये दुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला गोवंडी, दिंडोशी आणि वांद्रे या तीन डेपोला प्राधान्य दिले जाणार आहे.या योजनेचा अभ्यास करण्यासाठी खास समिती नेमली जाणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनातर्फे देण्यात आली.
बेस्ट प्रशासन पुढील दोन वर्षांत ४५०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात सामील करणार आहेत.२०२७ पर्यंत बेस्टमधील एकूण बसेसची संख्या १० हजारांपर्यंत जाणार आहे.त्यामुळे या गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी बेस्टने आपल्याच डेपोमध्ये दुमजली पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामध्ये पहिल्यांदा गोवंडी,दिंडोशी आणि वांद्रे या तीन डेपोची निवड करण्यात आली आहे.
सध्या बेस्टचे २७ बस डेपो असून त्यात ३९४१ बसेस उभ्या केल्या जातात.तसेच सॅटेलाईट पार्किंग तसेच बेस्टच्या मालकीच्या इतर जागेत ५११ बसेस उभ्या केल्या जाऊ शकतात.पण ही जागाही भविष्यात अपुरी पडणार असल्यामुळेच बेस्ट प्रशासन हा दुमजली पार्किंगचा विचार करत आहे.