मुंबईतून हिरे बाजार उठवलाच सुरतच्या अतिभव्य हिरा मार्केटचे उद्घाटन

सुरत – मुंबईत अनेक दशके जोमात सुरू असलेला हिरे बाजार पूर्णपणे सुरतला हलवून अखेर मुंबईतून होणारी हिर्‍यांची उलाढाल आज अखेर संपविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सुरतला उभारलेल्या अतिविशाल हिरे बाजार इमारतीचे उद्घाटन केले. इतकेच नव्हे तर सुरत विमानतळाचा आंतरराष्ट्रीय स्तर उंचावत आज सुरत ते दुबई विमान उड्डाणालाही हिरवा झेंडा दाखवला.
हिर्‍यांवरील प्रक्रिया करण्याचा मुख्य उद्योग आतापर्यंत मुंबईतील गिरगावात आणि मग वांद्रे-कुर्ला संकुल येथे होता. बीकेसीमध्ये हिरे व्यापारासाठी आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, मुंबईतील जागेची मोठी कमतरता, जमिनीचे भरमसाठ भाव, सुरत येथून कच्चे हिरे घेऊन येण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ ही कारणे देत सुरत येथे भव्य हिरेबाजार बांधण्याचा घाट काही वर्षांपूर्वी घालण्यात आला. सुरतचा हिरे बाजार आता तयार झाला असून, व्यापार्‍यांना अनेक सवलती देऊन तिथे बोलावण्यात आले आहे. व्यापार्‍यांनी आपल्या तिथल्या कार्यालयांचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच केले असले तरी पंतप्रधानांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन आज झाले.
आज सुरत डायमंड बुर्सचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातीत केलेल्या आपल्या भाषणात सुरतचे भरपूर गुणगान गायले. ते म्हणाले की, सुरत शहराच्या वैभवात आणखी एका हिर्‍याची भर पडली आहे. तो हिराही छोटा नसून जगातील सर्वोत्तम आहे. सुरतची प्रगती झाली तर गुजरातची प्रगती होईल आणि गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. गेल्या काही वर्षांत सुरत हे नवे व्यापारी पेठ म्हणून उदयाला येत आहे. त्यामुळे इथे सराफा बाजार केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरत डायमंड बुर्स तयार करण्यात आले आहे.
यामुळे देशाला जागतिक स्तरावर हिरे व्यापार करण्यास संधी मिळेल.
तुम्हा सर्वांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार सुरतचेही सामर्थ्य वाढवत आहे. आमचे सरकार सुरतमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करत आहे. आज सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. सुरतमध्ये मेट्रो रेल्वे सेवा आहे. सुरत बंदरातून अनेक महत्त्वाच्या उत्पादनांची निर्यात होते. सुरत सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्राशी जोडले जात आहे. इतकी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी जगातील फार कमी शहरात आहे. सुरतला बुलेट ट्रेन प्रकल्पाशीही जोडले आहे. वेस्टर्न डेडिकेट फ्रेट कॉरिडॉरवरही काम सुरू आहे. यामुळे उत्तर-पूर्व भारतपर्यंत सुरतची रेल्वे कनेक्टिव्हिटी सशक्त होईल. इतके आधुनिक दळणवळण असणारे सुरत देशाचे एकमेव शहर आहे. याचा जास्तीत जास्त लाभ उठवा.
मोदी पुढे म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत तिसर्‍या क्रमांकावर जाणार आहे. सरकारने येणार्‍या 25 वर्षांचे लक्ष्य ठरवले आहे. 5 ट्रिलियनच नव्हे, तर 10 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी काम केले जात आहे. आम्ही देशाच्या निर्यातीलाही विक्रमी उंचीवर घेऊन जाणार आहोत. यात सुरतच्या डायमंड इंडस्ट्रीची जबाबदारी वाढली आहे. देशाच्या प्रगतीत सुरतची भागीदारी कशी वाढेल, हे सुरतने ठरवले पाहिजे. डायमंड सेक्टर हे आव्हान आहे आणि संधीही आहे. हिर्‍यांच्या दागिन्यांच्या निर्यातीत भारत पुढे आहे. सिल्व्हर कट हिर्‍यातही आपण अग्रणी आहोत. मात्र, जगातील एकूण निर्यातीत भारताची टक्केवारी फक्त साडेतीन टक्के आहे. सुरतने ठरवले तर जेम्स आणि ज्वेलरी निर्यातीत आपण 10 टक्क्यांवर जाऊ शकतो.
सुरत डायमंड बुर्सचे उद्घाटन झाल्यावर सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या विमानतळाला दोनच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी तीन वर्षांपासूनच होत आहे. या विमानतळावरून सुरत-दुबई ही पहिली आंतरराष्ट्रीय सेवा आज सुरू झाली.
सुरतच्या हिरेबाजाराच्या उद्घाटनानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार एक्सवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सुरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या डायमंड बुर्सचे उद्घाटन झाले. याबद्दल गुजरात सरकारचे अभिनंदन करावे की, मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यांदेखत पळवला गेला याचे दुःख व्यक्त करावे हेच समजेनासे झाले आहे. मुंबईतला हिरे व्यवसाय संपवून सुरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असताना आपले सत्ताधारी आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका
घेत राहिले.
तर सुरतच्या हिरे बाजाराचे उद्घाटन करून मोेदी यांनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top