मुंबईत नवे वॉशिंग मशीन आले! राज ठाकरे – यशवंत जाधव भेट

मुंबई- मुंबईत नवे वॉशिंग मशीन आले आहे! भाजपाच्या बरोबरीने हे वॉशिंग मशीन कामाला लागले आहे, अशी टीका आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर होत आहे. शिवसेनेत असताना ज्यांच्यावर प्रखरपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले ते नेते आता शिंदेंचे शिलेदार बनताच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले असून हे ‘भ्रष्ट’ नेते पुष्पगुच्छ घेऊन राज ठाकरेंच्या भेटीला येत आहेत. दिलखुलास स्मित करीत राज ठाकरे त्यांना आशीर्वादाच्या रूपाने क्लीन चिट देत आहेत.
आज शिंदे गटाचे दक्षिण मुंबईचे उमेदवार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी राज ठाकरेंच्या घरी त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी नुकतीच कणकवलीत नारायण राणेंसाठी प्रचार सभा घेतली. त्याप्रमाणे आता यामिनी जाधव यांच्यासाठी घेणार का? हा प्रश्न विचारला जात आहे.उमेदवार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे अखंड शिवसेनेत असताना मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. या काळात रस्त्यांवरील खड्ड्यांपासून अनेक विषयांच्या बाबतीत मनसेने सातत्याने त्यांच्यावर आरोप केले. 14 ऑक्टोबर 2021 रोजीच्या व्हिडिओत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रस्ते दुरुस्तीचे 2200 कोटींचे कंत्राट काळ्या यादीतील कंत्राटदारांना देणार असल्याचा आरोप केला तेव्हा यशवंत जाधवच स्थायी समितीचे अध्यक्ष होते. यशवंत जाधवांवर धाड पडली तेव्हा त्यांच्या घरी सापडलेल्या डायरीत एक महागडे घड्याळ मातोश्रीला दिल्याची नोंद होती. तेव्हाही गहजब झाला. ‘घड्याळ मातोश्रीची वाट लावेल’ अशी टीका मनसेने केली. आयकर खात्याने यशवंत जाधव आणि यामिनी जाधवांवर 143 कोटी भरण्याची नोटीस बजावली. 2022 साली ही कारवाई झाली होती. या संपूर्ण काळात मनसेने त्यांच्यावर सतत आरोप केले होते. मात्र आज यशवंत आणि यामिनी जाधव हे राज ठाकरेंना भेटले. आता मनसैनिकांना यामिनी जाधव यांचा प्रचार करायचा आहे. याआधी आरोप झालेले राहुल शेवाळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद मिळविले.
संदीप देशपांडेंनी सोमय्यांची जागा घेतली
भाजपा नेते किरीट सोमय्या हे विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून कागदपत्रे फडकावित खळबळ माजविण्यात अग्रेसर होते. त्यांनी आरोप केले की, ती व्यक्ती भाजपात जाऊन शांत झोपू लागली. त्यामुळे सोमय्यांची पत घसरली. आता सोमय्यांची जागा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतली आहे. त्यांना फक्त विरोधकांचा भ्रष्टाचार दिसतो. सध्या मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्याने आता फक्त मविआचा भ्रष्टाचार सांगणारे व्हिडिओ टाकण्याचे काम आपल्या ‘आऊट ऑफ द बॉक्स’ कार्यक्रमात करण्यापुरते त्यांचे कार्य राहिले आहे. परिणामी त्यांचीही पत घसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top