मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प दोन्ही राज्यांत १०० टक्के भूसंपादन

मुंबई – मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम दोन्ही राज्यांत अतिशय वेगात सुरू झाले आहे. गुजरातमधील स्थापत्य कामांना वेग आला असून दोन्ही राज्यांतील जमीन अधिग्रहण १०० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी दिली.
या प्रकल्पासाठी एकूण १३८९.४९ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती.त्यामध्ये गुजरात राज्यात ९५१.१४ हेक्टर, डहाणूमध्ये ७.९० हेक्टर आणि महाराष्ट्रात ४२९.७१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करायचे होते. गेल्या वर्षी गुजरातमध्ये १०० टक्के आणि महाराष्ट्रात ९६ टक्के भूसंपादन करून नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू केले होते. उर्वरित जमीन अधिग्रहणाबाबत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी आपल्या एक्स अकाऊंटवरून त्याबाबत माहिती दिली.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून सांगण्यात आले की,आतापर्यंत या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे १२०.४ किमी गर्डर लाँच करण्यात आले असून २७१ किमी पिलर कास्टिंग पूर्ण झाले आहे. जपानच्या शिनकानसेनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एमएएचएसआर कॉरिडॉर ट्रॅक सिस्टीमसाठी पहिले प्रलंबित काँक्रीट ट्रॅक बेड टाकण्याचे काम सुरत आणि आणंद येथे सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटादरम्यान २१ किमी लांबीच्या बोगद्याचा एक भाग असलेल्या भारतातील पहिल्या सात किमीच्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे. तसेच मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top