मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी नाफेडकडून कांदा विक्री केंद्र

मुंबई –

कांद्याचा बाजार स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत आता जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध होणार आहे. सवलतीच्या दरात नागरिकांना कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून मोबाइल व्हॅनद्वारे एक ते दोन किलोच्या पॅकिंगमध्ये २५ रुपये किलो दराने कांदा दिला जाणार आहे. यासाठी येत्या काळात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल आदी १०० ठिकाणी सवलतीच्या दरात कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

ऐन दिवाळीत नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरात कांदा विक्री केल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालय वेगवेगळ्या ग्राहक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बाजारपेठेत हस्तक्षेप करत असते. या माध्यमातून नागरिकांना महागाईची झळ बसू नये या उद्देशातून भारत चणाडाळ, भारत आटा व कांदा विक्री केंद्र माध्यमातून नागरिकांना दिलासा दिला जाणार आहे. मात्र सरकारच्या या योजनेमुळे व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण बाजारपेठेत ४० ते ४५ रुपयाने कांदा दिला जात असून सरकारच्या या भूमिकेमुळे ग्राहकांना दिलासा तर मिळेल मात्र दर्जा मिळणार नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top