मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी वर्षभरात ८ हजार कोटींनी घटल्या !

मुंबई- देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.या महापालिकेच्या विविध बँकांमधील मुदतठेवी वर्षभरात तब्बल ८ हजार कोटींनी घटल्या आहेत.३१ मार्च २०२२ रोजी मुदतठेवींची रक्कम ही ९१ हजार ६९० कोटी रुपये होती.त्यानंतर जून २०२३ रोजी मुदतठेवी ८६ हजार ४६७ कोटी रुपये होत्या. त्या नोव्हेंबर २०२३ च्या अखेरपर्यंत ८४ हजार ६१५ कोटींवर आल्या आहेत.
मुंबई पालिकेत मार्च २०२२ पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकाच्या राजवटीत ३१ मार्च, २०२२ रोजी पालिकेच्या मुदतठेवींची रक्कम ९१ हजार ६९० कोटी रुपये होती. परंतु ३० जून, २०२३ रोजी ८६ हजार ४६७ कोटींवर पोहोचली. त्यामुळे पालिकेच्या मुदतठेवी खर्च केल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून प्रशासक आणि राज्य सरकारवर केला जात आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते,आमदार आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून याचा जाब विचारला होता. तसेच पालिकेत घोटाळ्यांचा आरोप केला होता. त्यावर आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले.पण आता आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना बळ देणारी माहिती समोर आली आहे.
पालिकेने विविध बँकांमध्ये असलेल्या मुदत ठेवींची माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये नोव्हेंबर २०२३ पर्यंत एकूण ८४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे नमूद केले आहे. तसेच या ठेवीतील अर्थसंकल्प अ, ई आणि ग या बाबतीत आरंभीची एकूण गुंतवणूक ८५ हजार ३७० कोटी एव्हढी होती.त्यापैकी ७ हजार ४८९ कोटींच्या रकमेची मुदत पूर्ण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top