मुख्यमंत्री नितीश कुमार ‘जदयू’च्या अध्यक्षांनाच पदावरून हटवणार?

पाटणा- इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारमध्ये परतले असून त्यांनी २९ डिसेंबर रोजी जदयू (जनता दल युनायटेड)ची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक बोलावली आहे. ही बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीत नितीश कुमार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सध्या कुठलेही संघटनात्मक पद नाही. त्यामुळे ते जदयूच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतील, अशी शक्यता आहे.
ललन सिंह यांची लालूप्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत जवळीक वाढली आहे. नितीश कुमार हे ललन सिंह यांची कार्यपद्धती आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत वाढत असलेल्या जवळीकीमुळे नाराज आहेत. त्यामुळे नितीश कुमार ललन सिंह यांना पदावरून हटवण्याची शक्यता आहे. यानंतर पक्षामधील कुठल्याही प्रकारची फूट टाळण्यासाठी नितीश कुमार हे स्वत: पक्षाचे अध्यक्ष बनू शकतात. ते अध्यक्ष व्हावेत अशी त्यांच्या निकटवर्तीय नेत्यांचीदेखील इच्छा आहे. ललन सिंह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मुंगेर मतदारसंघातून लढण्यास इच्छूक आहेत. या मतदारसंघातील ते विद्यमान खासदार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top