मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची उमेदवारी फडणवीसांनी जाहीर केली! शिंदेंची केविलवाणी स्थिती

नागपूर – महायुतीतील जागावाटपाच्या वादामुळे गेले अनेक दिवस जाहीर होत नसलेली कल्याण-डोंबिवली मतदारसंघाची उमेदवारी अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना देण्यात आली. मात्र, त्यांच्या नावाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून केली. या घोषणेमुळे कल्याण-डोंबिवलीचा तिढा सुटला असला तरी त्यामुळे भाजपाने ठरवल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मुलालाही उमेदवारी देता आली नाही, असा संदेश गेला आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांनीच कल्याण-डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी स्थानिक भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची नाराजी अजून संपलेली नाही. खास करून कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपाचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करणार नाही, असा पवित्रा आ. गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतला आहे. तसा ठरावही एका बैठकीत मंजूर केला आहे. आता श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर आ. गायकवाड काय भूमिका घेतात, यावर श्रीकांत शिंदे यांना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांविरुद्धची लढत सोपी की, अवघड ठरणार हे अवलंबून असेल.
कल्याण – डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच वादविवाद होते. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. यंदा त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाच्याच स्थानिक पदाधिकारी व नेत्यांकडून तीव्र विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांचे पुत्र असल्याने त्यांच्या नावाची घोषणा पहिल्या फटक्यातच व्हायला हवी होती. परंतु शिवसेना उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊनही त्यात श्रीकांत शिंदे यांचे नाव नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन आपल्या मुलाला तिकीट देण्यात कमी पडत असतील तर शिवसेनेच्या इतर इच्छूक उमेदवारांना ते कशी उमेदवारी मिळवून देतील, असा प्रश्न विचारला जात असताना आज नागपुरात भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित केली. यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘श्रीकांत यांना भाजपाकडून विरोध नाही. ते कल्याणमधून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार असतील. ते महायुतीचे उमेदवार असतील. भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्यावेळेपेक्षा जास्त मतांनी आमच्या महायुतीमध्ये असलेले भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासपा हे पक्ष श्रीकांत यांना निवडून आणतील.’
फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर केल्यावर शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, उपमुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव घोषित केले, यातून महायुतीत किती चांगला समन्वय आहे, हे दिसून येते. तर खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी त्यांच्या प्रचारकार्याला सुरुवात करावी. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 400 पार हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. खासदार शिंदे यांनी यापूर्वीही आणि मागच्या पाच वर्षांच्या काळात कल्याण लोकसभा हद्दीतील विधानसभा मतदारसंघात विकासाची अनेक कामे केली आहेत. बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत. या
विकासकामांमुळे नागरिक समाधानी आहेत. या समाधानाची पावती आपणास येत्या लोकसभा निवडणुकीत नक्की मिळेल, असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top