मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची बैठक घेतली! ठाणे,सिंधुदुर्गात रुग्ण! चिंता वाढली

मुंबई- जेएन1 या कोरोनाच्या नव्या विषाणूचे रुग्ण केरळमध्ये सापडल्यावर आता तो महाराष्ट्रातही पोहोचला आहे. ठाणे, सिंधुदुर्गात नव्या कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू सौम्य असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र देशात नव्या कोरोनाने आतापर्यंत सहा बळी घेतले असल्याने महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेतला. त्यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही देतानाच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असेही सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका 41 वर्षीय पुरुषाला आणि ठाण्यातील एका 19 वर्षीय तरुणीला नव्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. ठाण्यातील मुलीला सर्दी-ताप आणि खोकल्याचा त्रास होता. ही मुलगी मूळची बिहारची असल्याचे सांगितले जात आहे. या तरुणीवर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. तिचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) पुणे येथे पाठवण्यात येणार आहेत. या संस्थेच्या अहवालानंतरच कोणता विषाणू आहे, याची माहिती कळेल, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.
कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणाच्या सज्जतेची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करून त्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स च्या सद्य:स्थितीबाबतचीही माहिती यावेळी घेतली. सध्या राज्यात 63 हजार विलगीकरण बेड्स, 33 हजार ऑक्सिजन बेड्स, 9 हजार 500 आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कोरोनाच्या जेएन1 विषाणूचे रुग्ण सर्वप्रथम सप्टेंबरमध्ये अमेरिकेत आढळला होता. त्यानंतर 40 देशांत या विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेनव्या कोरोनाबाबत अलर्ट जारी केला आहे.भारतात या विषाणूचा पहिला रुग्ण 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये आढळला. तेव्हापासून नव्या विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या 24 तासांत देशात 358 नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरात 614 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 21 मे नंतरचा हा वर्षातील सर्वाधिक आकडा आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2669 वर गेली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे आतापर्यंत केरळमध्ये 3, कर्नाटकात 2 तर पंजाबमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून नागरिकांसाठी मार्गदर्शिक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top