मुंबई – मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील फोर्टिस हॉस्पिटलजवळ रात्री उशिरा भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. अमृता पूनमिया (३४), असे मृत महिलेचे नाव असून त्या शिक्षिका होत्या.
अमृता पती विशाल आणि दोन वर्षांची मुलगी हेजल यांच्यासोबत दुचाकीवरून रात्री ११ वाजता जात होत्या. त्यावेळी फोर्टिस हॉस्पिटलजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की अमृता रस्त्यावर खाली पडल्या. त्या ट्रकच्या चाकाखाली आल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक लोकांनी अमृता यांना जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. विशाल आणि हेजल यांना दुखापत झाली नाही. या अपघातानंतर चालक फरार झाला असून याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








