डेहराडून – उत्तराखंडच्या गढवाल परिसरात मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा आज थांबवली. बद्रीनाथ-विष्णू प्रयाग महामार्गाजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली.उत्तराखंडच्या गढवाल परिसरासह टीहरी, बागेश्वर, अल्मोडा, नैनीताल आणि चंपावन जिल्ह्यांत उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. हवामान खात्याच्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आदेश दिलेला आहे. ऋषिकेश आणि विकासनगर येथील यात्रेकरूंना चारधाम यात्रेसाठी पाठवू नये,अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेचा विचार करून यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आलेल्या पुरात आतापर्यंत ११४ प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.









