मृत्युदंडाची शिक्षा दिलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भारताचे परराष्ट्रमंत्री भेटले

नवी दिल्ली –

हेरगिरीच्या आरोपावरून भारतीय नौदलातील ८ निवृत्त अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. भारताने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सरकार या प्रकरणाबाबत गंभीर आहे. तुमची चिंता आणि वेदना आम्ही समजू शकतो. त्यांच्या सुटकेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत राहील. यासंदर्भात कुटुंबांशी समन्वय साधला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारच्या एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. २९ मार्च २०२३ रोजी त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकांतवासात ठेवले आहे. कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस अॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते. रॉयल ओमान एअर फोर्समधून निवृत्त झालेले वैमानिक व ओमानी नागरिक खमिस अल अजमी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. ८ अधिकाऱ्यांसोबत त्यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top