मेक्सिकोत ख्रिसमस पार्टीत गोळीबार ! १६ जणांचा मृत्यू

मेक्सिको

मेक्सिकोच्या उत्तर-मध्य राज्य ग्वानाजुआटोमधील साल्वाटिएरा शहरात काल पहाटे एका ख्रिसमस पार्टीत काही अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात पार्टीतील १६ लोकांचा मृत्यू झाला. या गोळीबारात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेक्सिकोतील स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, साल्वाटिएरामधील नागरिक ख्रिसमस पार्टी झाल्यानंतर पोसाडा म्हणून ओळखल्या जाणार्‍या इव्हेंट हॉलमधून बाहेर पडत होते. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या काही अज्ञात बंदूकधार्यांनी गोळीबार केला.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. गोळीबारानंतर संपूर्ण पार्टीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बंदुकधार्यांनी गोळीबार का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या बंदुकधारकांचा शोध घेत असून या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पार्टीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, जवळपास ६ जण बंदूका घेऊन कार्यक्रमस्थळी आले होते. कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणांभोवती हे बंदुकधारक सतत गोल फिरत होते. त्यांना पार्टीचे निमंत्रण नसल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बंदुकधारकांनी गोळीबार सुरू केला. ग्वानाजुआटो हे जलिस्को कार्टेल आणि सिनालोआ कार्टेल समर्थित स्थानिक टोळ्यांमधील रक्तरंजित युद्धासाठी कुप्रसिद्ध आहे. या राज्यातील हत्यांचे प्रमाण मेक्सिकोमध्ये सर्वाधिक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top