मोखाडा तालुक्यात फर्‍या रोगामुळे ३ जनावरांचा मृत्यू

पालघर- जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अनेक जनावरांना ‘फर्‍या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या तालुक्यातील खोडाळा परिसरात या रोगामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रोगामुळे आतापर्यत ३ जनावरांचा बळी गेला असून दोन जनावरे अत्यवस्थ आहेत.
खोडाळा येथील बाळू हमरे यांचे दोन बैल आणि रामू कवर यांचा एक बैल या ‘फर्‍या’ रोगाचे बळी ठरले आहेत. तर विजय वाघ या शेतकर्‍याच्या दोन गायी सध्या अत्यवस्थ स्थितीत आहेत. या परिसरात कोणत्याच प्रकारचे पशू लसीकरण करण्यात आलेले नाही. खोडाळा येथे एकमेव महिला पशुधन विकास अधिकारी कार्यरत असून त्यांच्याकडे एकही सहकारी कर्मचारी उपलब्ध नाही. तसेच या अधिकार्‍यांना ऑनलाइन रिपोर्टींग आणि तालुक्यातील विविध मिटींग होत असल्याने मूळ पदावरील सेवा बजावणे कठिण झाले आहे.खोडाळा तालुक्यात ५९ महसुली गावे आणि २२२ पाडे आहेत.
लोकसंख्येच्या मानाने जनावरांची संख्या जास्त असून प्रत्यक्ष खेड्यापाड्यात काम करण्यासाठी कर्मचारीच नाहीत. या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिकामी आहेत.त्यामुळे ही पदे भरून आदिवासी बांधवांच्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी खोडाळा गावचे उपसरपंच उमेश येलमामे यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top