मोदींची गॅरंटी! भाजपाचा जाहीरनामा एकच निवडणूक! समान कायद्याचे आश्‍वासन

नवी दिल्ली – भाजपाने आज पक्षाच्या मुख्यालयात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. ही लोकसभा निवडणूक पंतप्रधान मोदींच्या वलयाभोवती फिरवली जाणार हे अगदी स्पष्ट करीत भाजपाने ‘मोदींची गॅरंटी’ या शीर्षकाचा जाहीरनामा जारी केला आहे. यात ‘एक देश, एक निवडणूक,’ ‘एक मतदार यादी आणि समान नागरी कायदा आणणार’ ही दोन महत्त्वाची आश्‍वासने दिली आहेत.
यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजपाच्या जाहीरनाम्याची प्रतीक्षा सर्वांना असते. कारण जे वचन दिले जाते ते पूर्ण केले जाते ही मोदींची गॅरंटी आहे. 4 जूनला विजयानंतर आश्‍वासने पूर्ण करण्याच्या कामाला त्वरित गती दिली जाईल. आताच नंतरच्या 100 दिवसांची योजना सरकारी कार्यालये तयार करीत आहेत. ‘एक देश, एक निवडणूक,’ ‘एक मतदार यादी आणि समान नागरी कायदा’ आणण्याचे मी आश्‍वासन देतो. त्याचबरोबर आर्थिक स्थिती कशीही असली तरी 70 वर्षांवरील सर्व वृद्धांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातील. जगात आर्थिक स्थानात भारताला पाचव्या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर न्यायचे आहे. 2025 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतान व्हाव्यात यासाठीही दावा
केला जाईल.
मात्र भाजपाच्या या जाहीरनाम्यात शेतमालाला किमान हमी भावाचा कायदा, स्वस्त शिक्षण, मतदानाची सक्ती, सरकारी नोकर्‍यांची हमी, जुनी पेन्शन, जातगणना आदि मुद्यांचा उल्लेख नाही. यामुळे हरियाणा महाराष्ट्र या राज्यांत प्रतिकूल प्रतिक्रिया उमटण्याचा धोका आहे.

मुख्य आश्‍वासने
समान कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड, वन नेशन, वन इलेक्शन, एक मतदार यादी, सौरऊर्जे-तून मोफत वीज, 70 वर्षांवरील सर्व आर्थिक स्तरातील वृद्धांना 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार (आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत), मुद्रा योजनेखाली आता 20 लाखांपर्यंत कर्ज (आधी 10 लाखांपर्यंत कर्ज मिळायचे), पाईपद्वारे स्वस्त स्वयंपाकाचा गॅस पोहोचवला जाईल, महिला ड्रोन पायलट बनतील. सर्व्हायकल कॅन्सर मुक्ती अभियान, ‘जाती गौरव’ योजना, तामिळ भाषेची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर उपक्रम, उत्तर-पूर्व व पश्‍चिम भारतात बुलेट ट्रेन सुरू करणार.

न दिलेली आश्‍वासने
शेतमालासाठी किमान दर कायद्याचे आश्‍वासन नाही, सरकारी नोकरी वाढविण्याचे आश्‍वासन नाही, जुनी पेन्शन देण्याचे आश्‍वासन नाही, शिक्षण स्वस्त करण्याचे आश्‍वासन नाही, जात गणनेचा उल्लेख नाही, सामान्य रेल्वेचे डबे वाढविण्याचे
आश्‍वासन नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top