म्हाडाच्या दक्षिण मुंबईतील घरांसाठी २८ डिसेंबरला लॉटरी

मुंबई – म्हाडाच्या दक्षिण मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून बृहतसूचीवरील २६५ पात्र अर्जदारांसाठीच्या संगणकीय सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. २८ डिसेंबरला दुपारी १ वाजता म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात ही संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर काढण्यात येणाऱ्या या सोडतीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या २६५ भाडेकरूंचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या वा जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते. इमारतीचा पुनर्विकास होतो, तसे संबंधित रहिवासी हक्काच्या घरात स्थलांतरित होतात. मात्र, त्याच वेळी अनेक इमारतींचा वर्षानुवर्षे पुनर्विकास होत नाही. अशा रहिवाशांना संक्रमण शिबिरातच राहावे लागते. गेली ३० ते ४० वर्षे रहिवासी संक्रमण शिबिरात राहत आहेत. संक्रमण शिबिरार्थीना घर देण्यासाठी रहिवाशांची यादी तयार करून त्यांच्याकडून अर्ज घेतले जातात.
बृहतसूचीसाठी नवे धोरण
३०० चौरस फुटांहून कमी क्षेत्रफळातील जुन्या रहिवाशांना ३०० ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर. ३०१ ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाचे जुने घर असलेल्या रहिवाशांना ४०० ते ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर. ४०१ ते ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे जुने घर असलेल्या रहिवाशाला ५०० ते ६०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर. क्षेत्रफळाचे जुने घर असलेल्या रहिवाशाला ६०० ते ७०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर. ६०१ ते ७०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या घराऐवजी ७०० ते ७५३ चौरस फूट क्षेत्रफळाचे घर. ७०१ व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाचे जुने घर असलेल्यांना ७५३ चौरस फुटांचे घर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top