म्हाडाच्या १६० गिरणी कामगारांना मुंबई मंडळातर्फे चाव्यांचे वाटप

मुंबई :

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र १६० गिरणी कामगार / वारस यांना आठव्या टप्प्यांतर्गत काल सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथाआमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन उपस्थित होते.

आमदार सुनील राणे म्हणाले की, आतापर्यंत २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या १४७० गिरणी कामगारांना १५ जुलै २०२३ पासून आठ टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्यातर्फे सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम वेगात सुरू आहे. या गिरणी कामगार / वारस यांची पात्रता लवकर निश्चित करून त्यांना सदनिकांच्या चाव्या देण्यात येतील.

बृहन्मुंबईतील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियान सुरू आहे. या अभियानाला गिरणी कामगार / वारसांचा वाढता प्रतिसाद बघता या अभियानाला १४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गिरणी कामगार/ वारसांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सुनील राणे यांनी यावेळी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top