युक्रेन युद्धाचा विरोध करणाऱ्या रशियन महिला पत्रकाराला शिक्षा

मोस्को

सत्ताधार्यांना विरोध करणार्या पत्रकारांना कायदेशीर कारवाईत अडकवण्याचे सत्र जगभर सुरू आहे. रशियातही सध्या हेच सुरू आहे. “युद्ध थांबवा” आणि “पुतीन तुमच्याशी खोटे बोलत आहेत” असे फलक घेऊन बातम्या प्रसारित करणाऱ्या ४५ वर्षीय माजी पत्रकार मरिना ओव्हस्यानिकोव्हा यांना रशियन न्यायालयाने बुधवारी त्यांच्या अनुपस्थितीत साडेआठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मरीना ओव्हस्यानिकोव्हा यांच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे, मरिना या एका वर्षापूर्वी त्यांच्या मुलीसह देश सोडून गेल्या आहेत.

रशियाच्या सरकारी वाहिनीवरील संध्याकाळच्या कार्यक्रमादरम्यान पत्रकार मरिना या एका सूत्रसंचालकाच्या मागे हातात युक्रेन युद्धविरोधी फलक घेऊन उभ्या होत्या. “युद्ध नको, युद्ध थांबवा. प्रचारावर विश्वास ठेवू नका, हे लोक तुमच्याशी खोटं बोलत आहेत,” अशा आशयाचे पोस्टर त्यांच्या हातात होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी “युद्ध नको, युद्ध थांबवा!” अशा घोषणाही दिल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर रशियन सैन्याविषयी खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता.

रशियामधील वाहिनीवरील बातम्यांवर सरकारकडून बारकाईने लक्ष ठेवले जाते. युक्रेन – रशियाच्या युध्दाबाबत केवळ रशियाची बाजू मांडण्यात येते. रशियामधील प्रसार माध्यमांवरील बातम्या दीर्घकाळापासून सरकारी नियंत्रणाखाली आहेत. युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर आलेल्या नव्या कायद्याद्वारे प्रसारमाध्यमांसाठी पूर्वीपेक्षा अधिक निर्बंध लागू करण्यात आले आहे. हा कायदा मार्च २०२२ मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानुसार रशियाच्या लष्करी कारवाईला “आक्रमण” म्हणणे बेकायदेशीर आहे. या कारवाईविरोधात कोणतीही खोटी बातमी दाखवणे हा गुन्हा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top