नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धसदृश संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशाच्या जनतेला संबोधित केले. यात त्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धबंदीबाबत मोठा खुलासा केला. ही युध्दबंदी पाकिस्तानने अवघ्या काही तासांत तोडली होती. मोदी यांनी आज स्पष्ट शब्दांत सांगितले की, पाकिस्तानातील दहशतवादी आणि लष्करी तळांविरुद्धची कारवाई संपलेली नाही, ती फक्त स्थगित केलेली आहे. भविष्यात पाकिस्तानने याबाबत कुठली पाऊले उचलतो, यावर आम्ही त्याचे मोजमाप करू. ऑपरेशन सिंदूर हे आता दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण बनले आहे. पाकिस्तानशी यापुढील चर्चा फक्त दहशतवादावरच आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल.
मोदी म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी दाखवलेल्या क्रौर्याने साऱ्या जगाला हादरवले. सुट्टी साजरी करणाऱ्या निष्पाप लोकांची कुटुंब आणि मुलांसमोर धर्म विचारून मारण्यात आले. हा दहशतवादाचा एक अतिशय भयानक चेहरा आहे. देशाची सद्भावना संपवण्याचा हा एक घृणास्पद प्रयत्न होता. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी ही अतिशय मोठी वेदना होती. या हल्ल्यानंतर, संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी एका सुरात उभा राहिला होता. आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मोकळीक दिली. आज प्रत्येक दहशतवादी संघटनेला कळले आहे की, आमच्या बहिणी आणि मुलींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचे काय परिणाम होतात.
ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, 6 मे रोजी रात्री उशिरा आणि 7 मे रोजी पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आणि प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले. भारत इतका मोठा निर्णय घेईल, याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जेव्हा भारताच्या क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतीच हादरल्या नाहीत तर त्यांचे मनोबलही डळमळीत झाले. बहावलपूर आणि मुरीदकेसारखी दहशतवाद्यांचे अड्डेही जागतिक दहशतवादाची विद्यापीठे होती. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत, त्यांचा संबंध या ठिकाणांशी आहे. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचे कुंकू पुसले. म्हणून भारताने दहशतवादाची ही मुख्यालये नकाशावरून पुसली. या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक कुख्यात दहशतवादी मारले गेले. गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार मुक्तपणे फिरत होते. ते भारताविरुद्ध कारस्थाने रचत होते. भारताने त्यांना एका झटक्यात उद्ध्वस्त केले. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान नैराश्यात पूर्ण बुडाला. त्यातून त्याने आणखी एक दुस्साहस केले. भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला साथ देण्याऐवजी भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्तानने आमचा गुरुद्वारा, घरे, मंदिरे आणि शाळा आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. पण पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने भारताने ठिकऱ्या उडवल्या. भारताने पाकिस्तानच्या छाताडावर हल्ला करून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अचूक मारा केला. पाकिस्तान हवाई दलाच्या विमानतळाचे मोठे नुकसान केले. तीन दिवसांत पाकिस्तानी लष्कराने कल्पनाही केली नाही इतका विनाश घडवला. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तानने सुटकेचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. जबरदस्त मार खाल्ल्यानंतर 10 मे रोजी दुपारी पाकिस्तानी सैन्याने आमच्या डीजीएमओशी संपर्क साधला. भारताविरोधात यापुढे कोणत्याही दहशतवादी कारवाया करणार नाही, असे त्यांनी सांगितले तेव्हा भारताने विचार केला. पण मी पुन्हा एकदा सांगतो आहे की, आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी
आणि लष्करी तळांविरुद्धची कारवाई फक्त स्थगित केली आहे. भविष्यात पाकिस्तानचे प्रत्येक पाऊल भविष्यात कसे पडेल, यावर आम्ही मोजमाप करून निर्णय करू. भारताचे हवाई दल, लष्कर, नौदल, बीएसएफ आणि निमलष्करी दल अलर्ट आहेत. सर्जिकल स्ट्राईक,एअर स्ट्राईकनंतर ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण आहे.
मोदी पुढे म्हणाले की, यापुढे आम्ही आम्ही दहशतवादाला आश्रय देणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार यांना वेगळे पाहणार नाही. भारताचा दृष्टिकोन स्पष्ट आहे, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत. पाणी आणि रक्तदेखील एकत्र वाहू शकत नाहीत. जर पाकिस्तानशी कोणतीही चर्चा झाली तर ती फक्त दहशतवादावरच आणि पाकव्याप्त काश्मीरवच होईल.
