युपी-बिहारचे लोक तमिळनाडूत येऊन शौचालय साफ करतात! द्रमुक खासदारांचे वादग्रस्त वक्तव्य

चेन्नई- तमिळनाडूमधील द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांनी नुकतेच उत्तर भारतीयांबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘उत्तर प्रदेश, बिहारमधून येणारे लोक तमिळनाडूमध्ये बांधकाम प्रकल्प, रस्ते आणि शौचालय साफ करण्याचे काम करतात,’ असे विधान मारन यांनी एका भाषणादरम्यान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामुळे आता नवा वाद सुरु झाला आहे.
भाजप प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी देखील त्यांच्या एक्स अकाऊंटवर मारन यांचा व्हिडीओ शेअर करत इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. पुन्हा एकदा भारतामध्ये फूट पाडून राज्य करण्याची खेळी खेळली जात आहे, असे कॅप्शन पुनावाला यांनी एक्सवरील पोस्टला दिली आहे. मारन यांनी भाषणावेळी इंग्रजी शिक्षण घेणारे आणि फक्त हिंदीमध्ये शिक्षण यांची देखील तुलना केली आहे. ते म्हणाले की, ‘इंग्रजी बोलणारे लोक मोठ्या पदावर आयटी कंपनीमध्ये काम करतात, तर हिंदी येणारे लोक हलक्या दर्जाची कामे करतात.’ त्यांच्या या विधानावर देखील पुनावाला यांनी टिका केली आहे. पुनावाला म्हणाले की, ‘इंडिया आघाडी भारतातील लोकांची जात, भाषा आणि धर्माच्या आधारावर विभागणी करत आहे. खासदार दयानिधी मारन यांचे वक्तव्य दुर्दैवी आहेच आणि द्रमुक पक्षाच्या नेत्यांवर तपास यंत्रणा कारवाई करत असताना असे विधान व्हावे, हा योगायोग नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील इंडिया आघाडीचे नेते गप्प का आहेत? नितीश कुमार, तेजस्वी यादव, लालू यादव, काँग्रेस, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे काहीच घडले नाही, असे का वागत आहेत? ते कधी भूमिका घेणार आहेत की नाही?’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top